अमरावती जिल्ह्यात अचलपूर तालुक्यातील खैरी शिवारात बिबट जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 05:39 PM2020-04-25T17:39:13+5:302020-04-25T17:42:27+5:30
अचलपूर तालुक्यातील खैरी-दोनोडा गावाच्या खैरी शिवारात वन व वन्यजीव विभाग यांच्या संयुक्त कारवाईत एका बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. सदर बिबट तीन ते चार वर्षे वयाचा नर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: अचलपूर तालुक्यातील खैरी-दोनोडा गावाच्या खैरी शिवारात वन व वन्यजीव विभाग यांच्या संयुक्त कारवाईत एका बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. सदर बिबट तीन ते चार वर्षे वयाचा नर आहे. शिवशंकर त्रिकाळ यांच्या शेतातून शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास अमरावती वनविभागाच्या रेस्क्यू टीमने त्याला पिंजऱ्यात घातले.
बिबट्याचा मागच्या पायाला लोखंडी ट्रॅप अडकलेला होता. त्यासोबत त्या ट्रॅपला साखळी होती. या ट्रॅपमुळे त्याच्या मागच्या पायाला जखमही झाली आहे. शेतातील मक्याच्या पिकात तो शिरला. २५ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते ८ दरम्यान शेताकडे गेलेल्या इसमास तो दिसला. त्याने ही माहिती गावकरी, पोलीस पाटीलसह आसेगाव पोलीस ठाणे आणि परतवाडा वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना दिली.
माहिती मिळताच सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक शिवबाला आणि अमरावती प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड, वनपाल डी.सी. लोखंडे, डी.बी. सोळंके, वनरक्षक नितीन अहिरराव, प्रशांत उमक, प्रदीप बाळापुरे, प्रवीण निर्मळ, धुमाळे, पी.के. वाटाणे, एस.जी. बरवट, आर.जी. गायकी, वाहनचालक मंगेश राऊत घटनास्थळी पिंजऱ्यासह दाखल झालेत. परतवाडा येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय घटारे यांच्यासह अमरावती वनविभागाच्या रेस्क्यू टीमचे अमोल गावनेर, मनोज माहुलकर, सतीश उमक, मनोज ठाकूर, आसिफ पठाणही घटनास्थळी पोहोचलेत.
आसेगाव पोलिसांच्या उपस्थितीत अमरावतीच्या रेस्क्यू टीमने त्या बिबट्यास ट्रँक्यूलायझर गनने बेशुद्ध केले. पायाचा ट्रॅप काढून जखमेवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी औषधोपचार केलेत. बेशुद्धावस्थेत त्याला स्ट्रेचरवर घेतले गेले आणि पिंजऱ्यात ठेवले. यावेळी ५०० ते ६०० लोकांचा जमाव तेथे जमला होता.
डोळ्यावर काळी पट्टी
बिबट्याला बेशुद्ध केल्यानंतर लागलीच त्याचे डोळ्यावर काळी पट्टी बांधली गेली. ही पट्टी पिंजऱ्यातील त्या बिबट्याने खैरी ते परतवाडा प्रवासादरम्यानच डोळ्यावरून काढून फेकली.
ट्रॅप लावला कुणी?
घटनास्थळापासून काही अंतरावर एक पारधी बेडा आहे. या लोकांनी प्राण्यांना पकडण्याकरिता हा ट्रॅप लावला असावा. पण, चुकून त्यात बिबट अडकल्याचा अंदाज वनविभागाकडून वर्तविला जात आहे. परतवाडा येथील वाघाच्या दवाखान्यात या बिबट्याला ठेवण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर त्यास एक तर त्याच्या नैसर्गिक अधिवासात किंवा प्राणी संग्रहालयात सोडण्यात येणार आहे.
खैरी शिवारात बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे. जेरबंद बिबट परतवाडा येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले.
- प्रदीप भड, वनपरिक्षेत्र अधिकारी, परतवाडावभाग, अमरावती