अनिल कडू
फोटो पी १५ बिबट
परतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे तत्कालीन क्षेत्र संचालक तथा अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांच्या साम्राज्यात प्रादेशिक वनविभागातील एका बिबट्याचा औषधोपचारादरम्यान एक वर्षापूर्वी मृत्यू झाला. हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणाप्रमाणेच या बिबट मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी होण्याची गरज आहे.
अमरावती प्रादेशिक वनविभागांतर्गत परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या अधिनस्थ अधिकारी, कर्मचारी व रेस्क्यू टीमने या बिबट्यास २५ एप्रिल २०२० रोजी अचलपूर तालुक्यातील खैरी दोनोडा गावानजीक खैरी शेतशिवारात जेरबंद केले होते. या बिबट्याचा मागील पाय लोखंडी ट्रॅपमध्ये अडकल्याने त्या पायाला जखम झाली होती. या जखमी बिबट्याला २५ एप्रिल रोजी व्याघ्र प्रकल्पाच्या परतवाडा येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला उपचारार्थ दाखल केले गेले.
सिपना वन्यजीव विभागाचे तत्कालीन उपवनसंरक्षक शिवाबाला एस यांचे मार्गदर्शनात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय घटारे यांनी त्यावर स्क्वीजकेज मध्ये औषधोपचार सूर केलेत. हा बिबट शेडूल वनमधील वन्यजीव असल्यामुळे क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांचे त्यावर सरळ नियंत्रण होते. पर्यायाने या बिबट्याची जबाबदारी त्यांचेवर होती. त्यांच्या अनुमतीशिवाय कुठलाही निर्णय स्थानिक यंत्रणेला घेण्याची मुभा नव्हती.
२५ एप्रिलपासून ३१ मे २०२० पर्यंत तब्बल ३७ दिवस या बिबट्याला उपचारार्थ या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला ठेवले गेले. उपचारार्थ दाखल असलेला हा बिबट तापाने फणफणत असतानाच मृत्युमुखी पडला. मृत्यूपूर्वी या बिबट्याचे रक्त नमुने गोरेवाडा नागपूर येथे तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. यातही काही गंभीर बाबी पुढे आल्या होत्या.
या बिबट्याच्या मागच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत होती. यात त्याला वेदनाशमक औषधींसह अँटिबायोटिक दिल्या गेले. पण, त्या पायाच्या एक्स-रे काढल्या गेला नाही. पोटाची सोनोग्राफी केल्या गेली नाही. त्याला स्क्वीज केजमधून बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडल्या गेले नाही. त्याला त्याच स्क्वीज केजमध्ये अडकऊन ठेवत तब्बल ३७ दिवस त्याच्या मरणाची वाट पाहिल्या गेली.
मृत्यूला दुर्लक्ष कारणीभूत
ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरवर प्राथमिक उपचार करून दोन-तीन दिवसात त्याला गोरेवाडा नागपूर येथे उपचारार्थ पाठविणे आवश्यक होते. पण तसे केल्या गेले नाही. अवघ्या चार वर्षे वयाचा सशक्त बिबटावर डॉ. अक्षय घटारे औषधोपचार करीत होते. यातच डॉ.घटारे यांना तेथून हलविले गेले. यामुळे या बिबट्याकडे आठ दिवस दुर्लक्ष झाले आणि बिबटाची प्रकृती खालावली.
दरम्यान जंगलातून ट्रकद्वारे आणल्या गेलेली मोठमोठी लाकडे या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला लागून टाकल्या गेलीत. यात त्या बिबट्याला असुरक्षित वाटू लागले. लाकडासह मानवी हस्तक्षेपातून होणारा आवाज बघून तो भेदरला. अशा अवस्थेतच स्क्विज केजमध्ये अखेर त्याची प्राणज्योत मालवली.