भूजलात १२ फुटांपर्यंत कमी, ४५५ गावांत पाणीटंचाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 10:33 PM2018-10-22T22:33:29+5:302018-10-22T22:33:54+5:30
यंदा सरासरीच्या २० ते ४० टक्क्यांपर्यंत कमी पाऊस झाल्याने भूगर्भाचे पुनर्भरण झालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात लघु पाणलोट क्षेत्रातील निरीक्षण विहिरींच्या पातळीत १२ फुटांपर्यंत कमी आल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदा सरासरीच्या २० ते ४० टक्क्यांपर्यंत कमी पाऊस झाल्याने भूगर्भाचे पुनर्भरण झालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात लघु पाणलोट क्षेत्रातील निरीक्षण विहिरींच्या पातळीत १२ फुटांपर्यंत कमी आल्याचे धक्कादायक वास्तव आहे. संभवत: यंदा किमान ४५५ गावे पाणीटंचाईच्या सावटाखाली असल्याचे निरीक्षण भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालात नोंदविण्यात आलेले आहे. यासाठी संभाव्य टंचाईच्या गावांत पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकट करण्यासाठी आतापासूनच कार्यवाही करणे आवश्यक झालेले आहे.
जिल्ह्याचा ७५ टक्के भूभाग बेसॉल्ट खडकाने व २५ टक्के पूर्णा नदीच्या गाळाने व्यापला आहे. यामध्ये १० ते १२ मीटरपर्यंतची खोली भूजल पुनर्भरणास योग्य आहे. मात्र, यंदा अल्यप पर्जन्यमानामुळे ही विपरीत स्थिती जिल्ह्यावर ओढावली असल्याने स्त्रोत बळकटीकरणासोबत अस्तित्वातील पाणीपुरवठा साधनांची देखभाल दुरूस्तीदेखील तेवढीच महत्वाची आहे. चिखलदरा व धारणी तालुक्यातीळ गावे डोंगराळ भागात आहेत. तेथील भूस्तराची जलग्रहण क्षमता कमी असल्याने भूजल पातळीत झपाट्याने घट येत आहे. यंदा मेळघाटात पाऊसदेखील कमी झाल्याने जानेवारीपासूनच पाणीटंचार्ईची झळ पोहोचणार आहे. दर्यापूर, अंजनगाव सुर्जी व भातकुली तालुक्याच्या काही भागात यंदा भीषण पाणीटंचार्ई राहणार आहे.
जिल्ह्यातील नऊ लघुपाणलोट क्षेत्रातील भूजल पातळीमध्ये २ ते ३ मीटरपर्यंत तूट आढळून आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ६८ गावांना, तसेच सात तालुक्यातील ९ लघुपाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये ३ ते ४ मीटरपर्यंत तूट आढळून आल्याने जिल्ह्यात आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ९५ गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे. चांदूर बाजार तालुक्यातील गावांना प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा होत आहे. या ठिकाणी पाण्याचा साठा सध्या उपलब्ध आहे.
मात्र, भूजल पातळी खोल गेल्याने या तालुक्यातही पाणीटंचाईचे सावट आहे. जिल्ह्यातील काही भागात भौगोलिक व भूशास्त्रीय परिस्थितीमुळे तसेच रबी पिकांसाठी होणाऱ्या अमर्याद उपश्यामुळे भूजलातील पाण्याच्या पातळीत कमी कालावधीतच कमी येण्याची शक्यता आहे.
वरूड, मोर्शी तालुक्यात
नवीन विहिरींसह उपशावर बंदी
वरूड व मोर्शी तालुका हा अतिविकसिढत पाणलोट क्षेत्र असल्यामुळे व बारमाही ओलीतक्षेत्र जास्त असल्यामुळे विहिरी व सिंचन विहिरींद्वारे भुजलाचा उपसा फार मोठ्या प्रमाणात होत असल्याने भूजल पातळीत झपाट्याने घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात महाराष्ट्र भूजल अधिनियम २००९ नुसार भुजल उपश्यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे व याच भागात अधिनियम आठ (१) मधील तरतुदीनुसार बंदी घालण्याची शिफारस भूजल सर्वेक्षण विभागाने केली आहे.
पाणीटंचाई : कालावधी व गावे
पाणीटंचाईच्या पहिल्या टप्प्यात आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत पाणलोट क्षेत्रात अंतर्भूत आमरावती, धारणी, भातकुली, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, मोर्शी व वरूड तालुक्यामध्ये ९५ गावे पाणीटंचाईच्या सावटाखाली आहे.
जानेवारी ते मार्च या कालावधीत अमरावती, भातकुली, चांदूर बाजार दर्यापूर, मोर्शी, धामणगाव रेल्वे, तिवसा, अंजनगाव सुर्जी व वरूड तालुक्यात ६८ गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट आहे.
एप्रिल ते जून या कालावधीत अमरावती, धारणी, चिखलदरा, अचलपूर, भातकुली, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, अंजनगाव सुर्जी, मोर्शी, वरूड व तिवसा या तालुक्यातील ३०२ गावांत पाणीटंचाई राहील.
यंदा भूजल पूनर्भरण झालेले नाही. गत पाच वर्षांच्या तुलनेत भूजल पातळीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. कलम २५ नुसार संभाव्य गावांमध्ये पाणीटंचाई घोषित करण्याची संदर्भात माहिती देण्यात आली.
- विजय कराड, उपसंचालक, जीएसडीए