अमरावती - राज्य शासनाने शालेय पोषण आहार योजनेस पूरक आहार म्हणून दूध भुकटी वाटप योजनेची मुहूर्तमेढ रोवली. त्याअनुषंगाने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या मागविली आहे. विद्यार्थ्यांना याच सत्रात दूध भुकटी वाटपाचे धोरण असल्याने ही धुरा प्राथमिक शिक्षकांवर सोपविण्याचे संकेत सूत्रांकडून मिळाले आहे.
विद्यार्थ्यांच्या खिचडी वाटपातून कसेबसे गुरूजींची सुटका होत नाही तोच आता नव्याने दूध भुकटी वाटपाची जबाबदारी सोपविली जाणार असल्याची चर्चा शिक्षणात वर्तुळात सुरू झाली आहे. पुणे येथील प्राथमिक शिक्षण संचालनालयाने १४ नोव्हेंबर रोजी पाठविलेल्या पत्राद्वारे राज्यातील शिक्षणाधिकाºयांना शाळास्तरावर ही योजना राबविली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना दूध भुकटी वाटपासंदर्भात पुरवठादार नियुक्त करण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबवायची आहे. परिशिष्ट ‘अ’मध्ये तालुकानिहाय इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांची एकूण पटसंख्या, शाळा आणि गावाचे नाव, मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक, प्रति विद्यार्थी ६०० ग्रॅम प्रमाणे आवश्यक दूध भुकटी किलो ग्रॅमची मागणी नोंदवावी लागणार आहे. परिशिष्ट ‘ब’मध्ये जिल्ह्याची एकत्रित मागणी प्राथमिक शिक्षण संचालनालयास दोन प्रतिमध्ये सादर करावी लागणार आहे. यात तालुक्याचे नाव गटशिक्षणाधिकाºयांचे नाव, मोबाईल क्रमांक, इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत पटसंख्या, प्रति विद्यार्थी ६०० ग्रॅम प्रमाणे आवश्यक दूध भुकटी किलो ग्रॅमचा समावेश अनिवार्य केला आहे. शाळास्तरावर एकही विद्यार्थी दूध भुकटीपासून वंचित राहू नये, त्याकरिता अचूक पटसंख्या आणि त्यानुसार दूध भुकटीची मागणी नोंदवावी लागणार आहे. मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकाºयांना प्राथमिक शिक्षणाधिकाºयांच्या माध्यमातून ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत शिक्षण संचालनालयाकडे विद्यार्थी पटसंख्येची माहिती पाठवावी लागेल, असे शिक्षण संचालक (प्राथमिक) सुनील चौहान यांनी कळविले आहे.
ई- निविदेसाठी लगीनघाई कशाला?राज्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहारासोबत दूध भुकटी वाटप करण्याच्या योजनेला २३ आॅगस्ट २०१८ रोजी मूर्तरूप मिळाले. मात्र, दूध भुकटी वाटप करण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी आता शिक्षण विभागाने लगीनघाई सुरू केली आहे. अगोदर पुरवठादार शोधायचा नंतर योजना मंजूर करायची, अशा प्रकार दूध भुकटी वाटपात तर सुरू नाही, अशी शंका वर्तविली जात आहे. शाळा सत्र सुरू होऊन सहा महिने लोटले असताना आता मध्येच दूध भुकटी वाटप कुणासाठी, हादेखील महत्त्वाचा प्रश्न आहे. शालेय शिक्षण विभागाकडे विद्यार्थ्यांचा डेटा असताना नव्याने पटसंख्येची माहिती हा नवा प्रयोग का? यातच गुपित दडलं असल्याचे बोलले जात आहे. दूध भुकटी वाटप योजनेमागे सुपीक डोकं कुणाचे याबाबतही चर्चा रंगू लागली आहे.