शुक्रवारनंतर विजेच्या गडगडाटासह हलका पाऊस
By admin | Published: January 12, 2016 12:11 AM2016-01-12T00:11:09+5:302016-01-12T00:11:09+5:30
यंदाच्या हिवाळ्यात फारशी थंडी जाणवली नाही. आता पुढील काही दिवस सरासरी १३ ते १५ डिग्री सेल्सिअस दरम्यान तापमान राहणार आहे.
हवामान तज्ज्ञांचा अंदाज
अमरावती : यंदाच्या हिवाळ्यात फारशी थंडी जाणवली नाही. आता पुढील काही दिवस सरासरी १३ ते १५ डिग्री सेल्सिअस दरम्यान तापमान राहणार आहे. शुक्रवारनंतर दोन ते तीन दिवस विदर्भातील काही ठिकाणी विजेच्या गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.
यंदाचा हिवाळ्यात गुलाबी थंडीचा आनंद केवळ तीन ते चार दिवस अनुभवायला मिळाला. जानेवारीच्या सुरुवातीला तापमान ९.५ डिग्री सेल्सिअसपर्यंत उतरल्याने थंडीचा प्रभाव जाणवला होता. मात्र, तापमान वाढल्याने आता पुन्हा थंडी गायब झाल्याचे चित्र आहे. अमरावती जिल्ह्यात कमाल तापमान ३० आणि किमान तापमान १४ डिग्री सेल्सिअस दरम्यान आहे. येत्या १४ जानेवारीपर्यंत किमान तापमान १३ ते १५ डिग्री सेल्सिअसदरम्यान राहणार असून १५ जानेवारीनंतर तापमानात थोडी वाढ होऊन कमाल तापमान १५ व किमान तापमान १८ डिग्री सेल्सिअसदरम्यान राहणार आहे. त्यातच दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसासह विजेचा गडगडाट सुध्दा होण्याची शक्यता आहे.
१७ जानेवारीपासून पुन्हा रात्रीच्या तापमानात किंचित घट संभवते. या दरम्यान आकाश अंशत: ढगाळ राहिल, अशी माहिती हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली.