फोटो - मोर्शी ०७ पी
मोर्शी : मोर्शी ते चांदूर बाजार मार्गावरील खानापूर गावातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. तेथून वाहने निघणे कठीण झाले असून, अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती संघटनेच्यावतीने उपजिल्हाप्रमुख रसिक ठाकरे यांच्या नेतृत्वात ८ सप्टेंबर रोजी दुपारी १ ते ५ या वेळेत रास्ता रोको, अर्धनग्न आंदोलन, खड्ड्यात साचलेल्या गटारात लोटांगण आंदोलन असे एकाच वेळी तीन प्रकारचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. मोर्शी उपविभागीय अधिकाऱ्यांना याबाबत लेखी निवेदन देण्यात आले.
मोर्शी ते चांदूर बाजार या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले आहे. परंतु, खानापूर गावातील गजानन महाराज ते राम मंदिरापर्यंत काम अपूर्ण आहे. परिणामी या ठिकाणी वर्दळीच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहतूकदारांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. अनेकदा अपघात घडले आहेत. वाहन ओव्हरटेक करताना खड्ड्यातील चिखल समोरील वाहनाच्या काचावर उडत असल्याने या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पादचारी नागरिक व विद्यार्थ्यांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणीसुद्धा केली. मात्र, कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने अखेर संतप्त गावकरी, सामाजिक संघटना, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी ८ सप्टेंबर रोजी या खड्ड्यात लोटांगण, अर्धनग्न आंदोलन व रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास याला सर्वस्वी शासन व प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा अशोक ठाकरे, संदीप भदाडे, मंगेश बोराळकर, अरुणा काकडे, प्रमोद कानफाडे, श्रीकृष्ण ढाकूलकर, अतुल ठाकरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी दिला आहे.