अमरावती : अमरावती व बडनेरा शहरांचा तब्बल चार दिवस पाणीपुरवठा बंद असणार आहे. ५ ते ८ डिसेंबर या कालावधीत घरगुती वा वाणिज्य वापराच्या नळाला पाणीपुरवठा होणार नाही, असे पत्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने रविवार, ४ डिसेंबर रोजी निर्गमित केले आहे. अचानक सोमवारपासून पुढे चार दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.
मजीप्राच्या पत्रानुसार, अमरावती पाणीपुरवठा योजनेच्या १५०० मिमी व्यासाच्या नेरपिंगळाई ते येथील तपोवन परिसरातील जलशुद्धिकरण केंद्रापर्यंत असलेल्या पी.एस.सी. गुरुत्ववाहिनीवर नागपूर महामार्गावरील बोरगाव फाटा (ड्रिम्जलॅंड) जवळ मुख्य जलवाहिनी रविवारी फुटली आहे. या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असून, ती दुरुस्तीकरिता अमरावती, बडनेरा शहरांचा पाणीपुरवठा चार दिवस बंद ठेवावा लागणार आहे. ५ ते ८ डिसेंबर या चार दिवसांच्या कालावधीत रात्रंदिवस जलवाहिनीच्या गळतीचे काम चालणार आहे. अचानक पी.एस.सी गुरुत्ववाहिनीवरील पाइप लाइन फुटल्याने नागरिकांना चार दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मजीप्राने केले आहे. याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना पाठविण्यात आले आहे.
सोमवारपासून पुढे चार दिवस पाणीपुरवठा होणार नाही, याबाबत नागरिकांची दिलगिरी व्यक्त करीत आहे. ५ ते ८ डिसेंबर असे चार दिवस जलवाहिनीच्या गळतीचे काम चालणार आहे. उद्भवलेल्या या स्थितीबाबत नागरिकांनी सहकार्य करावे.
- अजय लोखंडे, उपकार्यकारी अभियंता, मजीप्रा अमरावती