कुटुंब नियोजनाआड ‘पुरुषी’ अंधश्रद्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 10:50 PM2019-06-28T22:50:13+5:302019-06-28T22:50:42+5:30
स्त्री-पुरुष समानतेचे कितीही नारे दिले तरी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबत पुरुषांकडून महिलांनाच पुढे केले जात आहे. जिल्ह्यात पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेच्या मागील पाच वर्षांत ४ हजार ११६ उद्दिष्टापैकी आतापर्यंत २ हजार ८२८ पुरुषांनी ही शस्त्रक्रिया केली आहे. विशेष म्हणजे, २०१४-१५ पासून दरवर्षी यामध्ये घट होत आहे.
जितेंद्र दखने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्त्री-पुरुष समानतेचे कितीही नारे दिले तरी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबत पुरुषांकडून महिलांनाच पुढे केले जात आहे. जिल्ह्यात पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेच्या मागील पाच वर्षांत ४ हजार ११६ उद्दिष्टापैकी आतापर्यंत २ हजार ८२८ पुरुषांनी ही शस्त्रक्रिया केली आहे. विशेष म्हणजे, २०१४-१५ पासून दरवर्षी यामध्ये घट होत आहे.
महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेपेक्षा पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया सोपी असते. महिलांची टाक्याची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करायची असेल, तर किमान तीन दिवस दवाखान्यात घालवावे लागतात. मात्र, पुरुषांची नसबंदी शस्त्रक्रिया दोन तासात उरकते. तरीही पुरुषांची या शस्त्रक्रियेसाठी नकारात्मक भूमिका असते. जिल्ह्यात २०१६-१७ या वर्षात ६३३ पुरुषांनी नसबंदी करून घेतली होती. गतवर्षी ३३१ पुरुषांनीही शस्त्रक्रिया केली आहे. नसबंदी करून घेणाऱ्या पुरुषांना १ हजार ४०० रुपये देण्यात येतात.
खुल्या प्रवर्गातील स्त्रियांना नसबंदी केल्यानंतर २५० रुपये, तर दारिद्र्यरेषेखालील किंवा सामाजिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना ६०० रुपये दिले जातात. पुरुष नसबंदीसाठी पाचपट अधिक रक्कम देऊनही स्त्रियांच्या नसबंदीच्या तुलनेत पुरुषांच्या नसबंदीचे प्रमाण मागील काही वर्षात सातत्याने घसरत आहे. पुरुष नसबंदी बाबत समाजात अनेक गैरसमज पसरले आहेत. यामुळे सुशिक्षित पुरुषही पुढे येत नाहीत. समाजामध्ये अजूनही पुरुष नसबंदीबाबत अढी कायम असल्याने स्त्रियांचा नसबंदी करण्याकडे अधिक कल आहे. त्यामुळे पुरुष नसबंदीचे प्रमाण वाढत नाही.
‘लहान कुटुंब-सुखी कुटुंब’ ही संकल्पना मागील दोन दशकांत सर्वदूर पोहोचली असली तरी कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियेत म्हणावी तशी गती पकडली दिसत नाही. यामध्ये पुरुष अजूनही मागे असल्याची चित्र दिसून येत आहे.
राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रातंर्गत आरोग्य विभागाला मागील पाच वर्षात ४ हजार ११६ उद्दिष्टापैकी आतापर्यंत २ हजार ८२७ पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली आहे. सदरचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न आहेत.
- डॉ. सुरेश असोले
जिल्हा आरोग्य अधिकारी