अमरावती : दोन वर्षांपूर्वी त्याने तिच्याशी शिवमंदिरात लग्न केले. त्यानंतर ते पती-पत्नीसारखे राहू लागले. शारीरिक संबंधदेखील प्रस्थापित झाले. त्यातून तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र, आता तिला घराबाहेर काढून देत नवजात बाळाचा स्वीकार करण्यास त्याने नकार दिला आहे. अखेर बुधवारी तिने त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात धाव घेऊन न्यायाची मागणी केली आहे.
पीडिताच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी मुख्य आरोपी श्रेयस धंदर (२३), दादाराव धंदर (६०), तीन महिला व उपसरपंच रोशन बहिरमकर (सर्व रा. सार्सी, ता. नांदगाव खंडेश्वर) अशा एकूण सहा जणांविरुद्ध २१ सप्टेंबर रोजी रात्री ११.२७च्या सुमारास बलात्कार व अन्य गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तक्रारीनुसार, आरोपी श्रेयस याने तक्रारकर्त्या तरुणीला प्रेमाच्या आणाभाका दिल्या. जुलै २०१९ पासून त्याने सतत तिच्याशी प्रेमालाप केला. सोशल मीडियावरदेखील त्यांचे प्रेम फुलले. तुझ्यावर प्रेम आहे, असे सांगून त्याने तिचा विश्वास संपादन केला. पुढे त्याने तिला नागपूर येथे नेऊन तेथील शिवमंदिरात तिच्याशी लग्न केले. आरोपीने लग्न करून तिला सार्सी येथे नेले. त्याच्या आई-वडिलांनीदेखील तिला सून म्हणून ट्रिटमेंट दिली. महिनाभरानंतर श्रेयस याने त्याच्या बहिणीच्या लग्नाचे कारण देऊन तिला तिच्या वडिलांकडे अमरावतीला पाठवून दिले.
तिला बडोद्यात नेले
कायदेशीर लग्न करू, अशी बतावणी करून पीडिताला अमरावती व नंतर गुजरातमधील बडोदा येथे नेण्यात आले. तेथे तिला शारीरिक संबंध करण्यास भाग पाडण्यात आले. त्यातून तिने जुलै २०२२ मध्ये बाळाला जन्म दिला. मात्र, त्यानंतर आरोपीने ‘मी तो नव्हेच’चा पवित्रा घेऊन त्या नवजात बाळाचा स्वीकार करण्यास नकार दिला. श्रेयस व त्याच्या कुटुंबातील लोकांनी आपल्याला शिवीगाळ व धमकी दिली. तेथील उपसरपंचाने पैसे घेऊन ‘शांत बस नाही तर गायब करीन,’ अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.