शहरात ब्युटीपालर्लरची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, यंदा कोरोनामळे बाहेरचे संपूर्ण कार्यक्रम बंद झाले असल्याने नटूनथटून व तयारी करून जाण्याची संधीच मिळत नाही. पार्लरही बंद बंद आहेत. महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर जाताना मास्क लावणे अनिवार्य झाल्याने संपूर्ण चेहरा झाकला जातो. म्हणून तयारी करून नटूनथटूनही जाण्याचे टाळले जात आहे. त्यातही लिपस्टिक लावल्यास मास्कला लागून तेवढे ओठावरील कापड लाल दिसेल, या ईर्ष्येने तेही लावण्याचे टाळले जात आहे. तसेही सौंदर्यप्रसाधने ही अत्यावश्यक सेवेत मोडत नसल्याने लॉकडाऊनच्या काळात ही दुकाने पूर्णत: बंद ठेवण्याचे फर्मानच शासनाने सोडल्यामुळे आणि महिलांची गरजसुद्धा धिमी झाल्याने नियमित वापरातील वस्तू किराणा दुकानांत उपलब्ध होत असल्याने तेथूनच खरेदी होत आहे. त्यामुळे सौंदर्य प्रसाधनाचा व्यवसाय पूर्णत: ठप्प झाल्याचे व्यावसायिकाने लोकमतशी बोलताना सांगितले.
बॉक्स
२४ तास घरातच मग ब्युटीपार्लर हवे कशाला?
कोरोना महामारीची पहिली लाट ओसरल्यानंतर दिवाळीपासून ब्युटीपार्लरच्या व्यवसायाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तीन ते चार महिने व्यवसाय बऱ्यापैकी चालला. मात्र, पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संसर्गाच्या भीतीपोटी महिला पार्लरमध्ये जाण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.
- पूनम लवंगे, ब्युटी पार्लर व्यावसायी
कोरोना महामारीच्या समस्येमुळे अत्यावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरू आहेत. जेमतेम मकरसंक्रांती दरम्यान व्यवसाय तेजीत आला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा धास्ती वाढविल्याने कडक लॉकडाऊन घोषित झाले नि ब्युटीपार्लरचा संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला. शासनाने आवश्यक ती उपाययोजना करून मदत द्यावी.
- ज्योती राठोड,
ब्युटीपार्लर व्यावसायी, मंगलधाम कॉलनी
ब्युटीपार्लरमध्ये फेसियल करताना तोंडाला हात लावावेच लागतात. तसेच तोंडाजवळ तोंड येणे साहजिक आहे. त्यामुळे तीन फुटांचे अंतर पाळले जाऊ शकत नाही. त्यामुळे आमचा व्यवसाय ठप्प पडला आहे. तसेही कोरोनामुळे महिला घरातच राहतात. नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेर पडायचेच असले तर मास्क चेहऱ्यावर असतोच. त्यामुळे लिपस्टिक नाही लावले, फेसियल नाही केले तरी चालते. परंतु या महामारीच्या काळाच आरोग्य जपणे हेच सौंदर्य टिकविण्याचे मूलमंत्र मानावे.
- पद्मा खांडे,
ब्युटीपार्लर व्यावसायी, सरस्वतीनगर
महिला म्हणजे सौंदर्याची खाण, असे म्हटले जाते. मात्र, महिलांना आपले सौंदर्य टिकविण्यासाठी सातत्याने काळजी घेणे गरजेचे आहे. वय वाढत असले तरी आपला चेहरा व सौंदर्य खुलून दिसल्यास त्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडतो. त्यामुळे काही महिला याबाबतीत अधिक जागरुक राहतात. मात्र, कोरोना महामारीच्या समस्येमुळे पार्लरमध्ये येणाऱ्या महिलांची संख्या पूर्णत: थंडावली आहे. मोठे कार्यक्रम असणाऱ्या घरातील महिला पार्लरमध्ये येत आहेत. मात्र, ती संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. त्यामुळे व्यवसाय ठप्प पडला आहे.
- छाया जिचकार,
ब्युटीपार्लर व्यावसायी, श्रेयस कॉलनी
माझ्या कुटंबात आठ सदस्य आहेत. नवऱ्याचा रोजगार थांबला असून, माझे ब्युटीपार्लरचेही व्यवसाय ठप्प झाले आहे. त्यामुळे आवक पूर्णपणे थांबल्याने चणचण भासत आहे. पूर्वी किमान १० ग्राहक येत होती. आता एकही नसल्याने घर चालविणे कठीण झाले आहे. ही महामारी केव्हा संपणार आणि व्यवसायाला बळकटी मिळणार, याची प्रतीक्षा करीत आहे.
- अश्विनी धांडे, ब्युटीपार्लर व्यावसायी, नरेडीनगर