अमरावती : जिल्ह्यात दरवर्षी पाऊस कमी जास्त प्रमाणात असतो. यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे. जिल्ह्यात पाणी साठवणूक योग्य पद्धतीने होत नसल्याने दरवर्षी डिसेंबर महिना सुरू झाला की, पाणीटंचाई समस्या जाणवायला लागते. ती समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेने जलजीवन योजनेंतर्गत मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना करणे शक्य होणार आहे.
जिल्हा परिषदेंतर्गत नागरिकांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी विविध पाणी योजना राबविल्या जात आहेत. मात्र, योजना गावागावांत पोहोचविल्या जात असताना योग्य नियोजन ग्रामपंचायत पातळीवर होत नसल्यामुळे पाणी समस्या सुटत नाहीत. त्यातच वाढती लोकसंख्या औद्योगिकरण यामुळे पाणीपुरवठा करणे कठीण होऊ लागले आहे. अनेक गावे आजही विविध धरणाच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे नैसर्गिक असलेल्या विहिरी बोरिंग बंधाऱ्याचा वापर नागरिकांकडून कमी होऊ लागला आहे.
बॉक्स
नैसर्गिक जलस्रोत पुनर्जीवित करणे गरजेचे
जिल्ह्यात दरवर्षी मुबलक प्रमाणात पाऊस पडत असतो मात्र जमिनीत पाणी हवे तसे मुरत नाही. त्याचबरोबर पावसामुळे तयार झालेल्या नैसर्गिक धबधब्यावरून पडणाऱ्या पाण्याची साठवणूक केली जात नाही. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे असे नैसर्गिक असलेल्या पाण्याचे स्त्रोताचा योग्य उपयोग करून पाणी साठवणूक कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेने आता पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
बॉक्स
प्रत्येक नागरिकाला ५५ लिटर शुद्ध पाणी देणार
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी योजना जलस्वराज्य योजनेंतर्गत गावागावांत केलेल्या योजना योग्य पद्धतीने सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. प्रत्येक व्यक्तीला ५५ लिटर पाणी देण्याचे उद्दिष्ट आहे. ज्या योजना बंद झाले आहेत त्या पुनरुज्जीवित केल्या जाणार आहेत. ज्या ठिकाणी पाण्याची सुविधा नाही त्या ठिकाणी ती केली जाणार आहे. गावातील नैसर्गिक स्त्रोत पुन्हा पुनर्जीवित केले जाणार आहेत. नागरिकांच्या प्रत्येक घरात नळाव्दारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.
बॉक्स
शाळा अंगणवाड्यांत जोडले पाण्याचे कनेक्शन
जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील शाळा आणि अंगणवाड्यांत पाण्याची सुविधा कशी आहे. याबाबत माहिती घेण्यात आली आहे. त्यानुसार ज्या शाळा,अंगणवाडीमध्ये नळ पाणी कनेक्शन नाही, अशा शाळांना जलजीवन योजनेअंतर्गत नळजोडणी दिली जाणार आहे. .
कोट
जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला ५५ लिटर शुद्ध पाणी देण्याचा मानस आहे. जलजीवन योजनेंतर्गत नागरिकांना घराघरांत नळ कनेक्शन दिले जाणार आहेत. पाणीपुरवठा योजनेची कामे १४ आणि १५ व्या वित्त आयोगातून केली जाणार आहे. शिवाय जलजिवन मिशनमधून पाणीपुरवठयाबाबत आराखडा तयार केला आहे.
- अमोल येडगे,
सीईओ, जिल्हा परिषद