मारडा येथे मध्यरात्री सशस्त्र दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 05:00 AM2021-10-05T05:00:00+5:302021-10-05T05:01:00+5:30
मारडा येथे नीलेश रमेश साव यांचे घर आहे. त्यांचे कृषिसेवा केंद्र असून घरातील अन्य सदस्य व्यापारी आहेत. रविवारी सर्व जण घरात झोपले असताना रात्री १ च्या सुमारास अज्ञात पाच ते सहा जणांनी घराचा मागचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला, तर घरातील लोकांना तुम्ही झोपून राहा, असे हिंदीत दरडावले. नीवेश साव यांचे वडील व पत्नी यांच्यावर चाकू रोखून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : तालुक्यातील मारडा गावात रविवारी रात्री १ वाजताच्या सुमारास एका घरात पाच ते सहा जणांनी धाडसी दरोडा टाकत चाकूच्या धाकावर १४ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी तातडीने घटनास्थळ गाठत अधिनस्थ यंत्रणेला तपासाचे निर्देश दिले.
मारडा येथे नीलेश रमेश साव यांचे घर आहे. त्यांचे कृषिसेवा केंद्र असून घरातील अन्य सदस्य व्यापारी आहेत. रविवारी सर्व जण घरात झोपले असताना रात्री १ च्या सुमारास अज्ञात पाच ते सहा जणांनी घराचा मागचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला, तर घरातील लोकांना तुम्ही झोपून राहा, असे हिंदीत दरडावले. नीवेश साव यांचे वडील व पत्नी यांच्यावर चाकू रोखून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्या दरोडेखोरांनी कपाटातील १० लाखांवर असलेले ४०३ ग्रॅॅम सोने, ८०० ग्रॅमची २० हजारांचे चांदीचे दागिने व ३ लाख ५० हजार रोख असा एकूण १३ लाख ८९ हजार ५००रुपयांचा ऐवज लंपास केला.
काही चोरटे घरात, तर काही जण बाहेर लक्ष ठेवून होते, असे साव कुटुंबातील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जवळपास अर्धा तास हा थरार सुरू होता. घरातील सर्व सोने, चांदी व रक्कम लुटून सर्व आरोपी पसार झाले. लागलीच कुऱ्हा पोलिसांना फोनवरून माहिती देण्यात आली.
कुऱ्हाचे पोलीस निरीक्षक ईश्वर वर्गे ताफ्यासह हजर झाले. श्वानपथकालादेखील पाचारण करण्यात आले. बयान नोंदविण्यात आली. त्यानंतर सोमवारी पहाटे अज्ञातांविरुद्ध भादंविचे कलम ३९५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ हेसुद्धा रात्रीच घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे तिवसा तालुक्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सीसीटीव्हीचा आधार
तिवसा, कुऱ्हा या भागातील ही अलीकडच्या काळातील सर्वात मोठी चोरी, दरोडा ठरला आहे. साव यांच्या घरात दरोडा पडला, १३.५० लाखांचा ऐवज लुटल्याची खबर सोमवारी सकाळी व्हायरल झाली. अनेकांनी साव यांचे घर गाठून घटनेचा कानोसा घेतला. पोलिसांनी कुऱ्हा-आर्वी मार्गालगतच्या सीसीटिव्ही फुटेजमधून काही सुगावा मिळतो काय, यावर नजर रोखली आहे. साव कुटुंबातील सदस्यांनी सांगितलेल्या वर्णनानुसार, हिस्ट्रीशिटर व रेकाॅर्डवरील गुन्हेगारांची उलटतपासणी घेतली जात आहे.
दरोडेखोरांना पकडण्यासाठी नाकेबंदी करण्यात आली. तीन तपास पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली. घटनास्थळाला भेट दिल्यानंतर दरोडेखोरांची ओळख पटेल, असा प्राथमिक अंदाज आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजदेखील तपासले जातील.
- अविनाश बारगळ,
पोलीस अधीक्षक, अमरावती