अमरावती : घरासमोर फिरत असलेल्या एका महिलेजवळील मोबाइल हिसकावून पळ काढणाऱ्या विधीसंघर्षित बालकांना राजापेठ पोलिसांनी २९ ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दुचाकी चोरीचे गुन्हेही उघड झाले. त्यानुसार त्यांच्याकडून मोबाइलसह चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनुसार, दस्तुरगनर येथील रहिवासी एक २३ वर्षीय महिला रात्री घरासमोर फिरत होती. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्याजवळील मोबाइल हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणी पिडित महिलेने १ ऑगस्ट रोजी राजापेठ ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला.
तपासादरम्यान त्या गुन्ह्यात दोन विधीसंघर्षित बालकांचा हाथ असल्याचे समोर आले. त्यानुसार त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली. सोबतच आणखी एका सहकाऱ्यासोबत तीन दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्यांच्या तिसऱ्या साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून मोबाइल, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व चोरलेल्या तीन दुचाकी असा एकूण २ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई राजापेठच्या ठाणेदार सीमा दाताळकर, पोलीस निरीक्षक पुनीत कुलट, पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे, मनीष करपे, रवी लिखितकर, पंकज खटे, विजय राऊत, गणराज राऊत, सागर भजगवरे, यांनी केली. त्यांना सायबर ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन तामटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत कासार, सचिन भोयर, सुषमा आठवले यांचे तांत्रिक मार्गदर्शन मिळाले.