तिवसा : जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या मोझरी गावच्या सरपंचपदी अपक्षाची वर्णी लागली आहे. १३ सदस्यीय मोझरी ग्रामपंचायच्या निवडणुकीत मंत्रिगटाला सात जागा मिळाल्या. मात्र, शुक्रवारी सरपंचपदाची निवडणुकीत विरोधी गटाचे सुरेंद्र भिवगडे हे ईश्वरचिठ्ठीने सरपंच झाले. उपसरपंचपदी काँग्रेस गटाचे प्रशांत प्रधान विराजमान झाले आहे. सरपंच निवडणुकीत हा मोठा उलटफेर समजला जात आहे.
तालुक्यातील मोझरी हे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे गाव. अनेक वर्षांपासून येथील ग्रामपंचायतवर काँग्रेसची सत्ता आहे. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेससमर्थित सात, तर विरोधी पॅनलचे सहा सदस्य निवडून आले. शुक्रवारच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून गजानन तडस व गणेश गायकवाड यांनी अर्ज दाखल केला. सहा सदस्यीय पॅनेलकडून सुरेंद्र भिवगडे, संजय लांडे आणि शुभांगी गहुकर यांनी अर्ज दाखल केला. वेळेपर्यंत कुणीही अर्ज मागे न घेतल्याने काही सदस्यांनी गुप्त मतदानाची मागणी केली. यामध्ये काँग्रेस गटाच्या गजानन तडस यांना पाच मते, तर गणेश गायकवाड यांना दोन मते मिळाली, तर अपक्ष उमेदवारांपैकी सुरेंद्र भिवगडे यांनादेखील पाच, तर संजय लांडे यांना एक मत मिळाले. त्यामुळे काँग्रेसचे गजानन तडस व अपक्ष सुरेंद्र भिवगडे यांच्यात ईश्वरचिठ्ठी करण्यात आली. यामध्ये सुरेंद्र भिवगडे हे विजयी झाले. उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस गटाचे प्रशांत प्रधान, तर विरोधी गटातून मनोज लांजेवार हे निवडणूक रिंगणात होते. यात प्रशांत प्रधान यांना आठ मते मिळाल्याने ते विजयी झाले.