शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावरून वाद, खासदार नवनीत राणा आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2022 03:59 PM2022-01-16T15:59:05+5:302022-01-16T16:26:36+5:30
ज्या महाराष्ट्राला शिवाजी महाराजांनी घडवले त्यांचा पुतळा बसविण्याची परवानगी का गरजेची आहे? असा सवालही नवनीत राणा यांनी यावेळी उपस्थित केला.
अमरावती : शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला होता. कुठल्याच प्रकारची परवानगी न घेता हा पुतळा बसविण्यात आल्याने पोलीस बंदोबस्तात हा पुतळा हटविण्यात आला. यावरून आता चांगलच राजकारण पेटलं असून खासदार नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांसह त्यांच्या घरासमोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.
शहरातील बडनेराकडे जाणाऱ्या राजापेठ उड्डाणपुलावर राजमाता यांच्या जयंतीदिनी आमदार रवी राणा यांनी १२ जानेवारीच्या मध्यरात्री कोणतीही परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता. या पुतळ्याला महापालिकेने परवानगी द्यावी अशी मागणी आमदार रवी राणा यांनी दोन दिवसांपूर्वी महापालिकेत केली होती. मात्र, महापालिकेनं ती नाकारली व पुतळा हटवला. यानंतर, राजकारण चांगलेच तापले असून आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर पोलीस आणि एसआरपीएफचा मोठा बंदोबस्त लावून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले.
दरम्यान, राणा दाम्पत्याच्या घरासमोर युवा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुर्दाबाद, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देण्यात आल्या. कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी काहींना ताब्यात घेतले. तर, ज्या महाराष्ट्राला शिवाजी महाराजांनी घडवले त्यांचा पुतळा बसविण्याची परवानगी का गरजेची आहे? असा सवालही नवनीत राणा यांनी यावेळी उपस्थित केला.
१२ जानेवारीला आमदार रवी राणा यांनी महापालिकेच्या परवानगीशिवाय राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. तर त्यापाठोपाठ काल रात्री शिवसेना तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी दर्यापूरमध्ये पेट्रोलपंप चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. अमरावती प्रकरणानंतर दर्यापूरमधील पुतळ्याच्या ठिकाणीही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तसंच पोलिसांनी शिवसेना तालुकाप्रमुखासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.