महापालिकेत प्रकाशावर आक्रोश, आमसभा गाजली

By admin | Published: September 27, 2016 12:12 AM2016-09-27T00:12:14+5:302016-09-27T00:12:14+5:30

शहरातील बहुतांश भागातील प्रकाश व्यवस्था कोलमडल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी अभूतपूर्व एकी करत ...

In the municipal corporation, there was a rage on the light, the general meeting was held | महापालिकेत प्रकाशावर आक्रोश, आमसभा गाजली

महापालिकेत प्रकाशावर आक्रोश, आमसभा गाजली

Next

महापौरही उद्विग्न : सर्वपक्षीयांचे यंत्रणेवर ताशेरे 
अमरावती : शहरातील बहुतांश भागातील प्रकाश व्यवस्था कोलमडल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी अभूतपूर्व एकी करत प्रशासनाला धारेवर धरले.सोमवारच्या आमसभेत प्रकाश विभागावर ताशेरे ओढले जात असताना खुद्द महापौरांनीही प्रकाश व्यवस्था कोलमडल्याचे सांगत उद्विग्नता जाहीर केली. २० सप्टेंबरला सर्वपक्षीय नगरसेविकांनी प्रकाश विभागाला कुलूप ठोकल्याच्या पार्श्वभूमिवर यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली आहे.
२० सप्टेंबरची स्थगित आमसभा सोमवारी सकाळी ११ वाजता महापालिकेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात घेण्यात आली. सभेच्या सुरुवातीला आजी-माजी सैनिकांच्या मुद्यावर अनुकूल निर्णय झाल्यानंतर १२ वाजता खऱ्याअर्थाने आमसभेतील प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात झाली. यात पहिलाच प्रश्न प्रदीप बाजड यांचा होता. डॉ.पंजाबराव देशमुख चौकापासून ते नवसारी नाक्यापर्यंत विद्युत पोल असताना अर्धवट एलईडी बल्ब का लावण्यात आले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यावरील उत्तराने समाधानी असल्याची भावना बाजड यांनी व्यक्त केली. मात्र बल्ब लागलेत का, अशी विचारणा करीत पीठासीन सभापती असलेल्या महापौरांनी आश्चर्य व्यक्त केले. बाजड यांच्या प्रभागात पथदिवे लावण्यात आलेत. आमच्या प्रभागातील केव्हा, असा प्रश्न महापौरांना पडला. व्यासपीठावर आसनस्थ असलेल्या महापौरांनीच आश्चर्य व्यक्त केल्याने जयश्री मोरे, नीलिमा काळे, कांचन ग्रेसपुंजे, सुजाता झाडे यांनी विषयाला धार देत प्रकाश विभागावर जबरदस्त ताशेरे ओढले. चर्चेदरम्यान कांचन ग्रेसपुंजे आणि प्रवीण हरमकर यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. सत्ताधाऱ्यांना जर प्रकाश विभागाला कुलूप लावत असतील आणि महापौर हतबलता दर्शवीत असतील तर सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक राहणार कसा, आरोप हरमकर यांनी केला. त्यावर विरोधी पक्ष कुठे आहे, अशी विचारणा करीत ग्रेसपुंजे यांनी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी केल्याचा आरोप केला.
शहरातील प्रकाश व्यवस्था मोडकळीस आली असून संबंधित विभाजप्रमुखाला निलंबित करण्याची मागणी अनेक नगरसेवकांनी केली. प्रभागातील लाईट बंद असल्यास नागरिकांचे नगरसेवकांना फोन येतात. मात्र साधा कंत्राटी कर्मचारीदेखील फोन उचलत नाही.
महिनोगिणती प्रकाश व्यवस्थेची समस्या निस्तरली जात नाही. बडनेरा शहराबाबत तर नेहमीच दुजाभाव केला जातो, असा आरोप करीत बडनेरा शहरातील नगरसेवकांनी शाब्दिक प्रहार केला. यापूर्वीही प्रकाश विभागाच्या उपअभियंत्यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही हा विभाग सुधारला नसल्याचे सांगत प्रशासनाचा या विभागावर वचक नसल्याचा पुनरुच्चार करण्यात आला. प्रशासन मुर्दाबाद, असा नाराही यावेळी देण्यात आला. तोंडप पाहून प्रकाश व्यवस्थेचे काम केले जात असल्याचा आरोप करून प्रशासनावर आरोपांचा भडिमार करण्यात आला.
प्रकाश विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या लेटलतिफीवर आरोप प्रत्यारोपांची फैरी झाडत असताना नगरसेवक जावेद मेमन हेदेखील अत्यंत आक्रमक झालेत. मला बोलू द्या, अन्यथा .... असा इशाराही त्यांनी देऊन टाकला.सर्वपक्षीय नगरसेवकांनी सारे सभागृह डोक्यावर घेतले असताना परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून आयुक्तांनी याबाबत निवेदन दिले.या चर्चेपूर्वीच आपण प्रकाश विभागातील अनागोंदीची दखल घेतली असून मनुष्यबळाची असलेली कमी ही वस्तुस्थिती असली तरी उद्या सायंकाळपर्यंत तक्रारी द्या, एका आठवड्यात निकाली काढू, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. त्यानंतर तब्बल एक तास सुरू असलेला हलकल्लोळ शमला. (प्रतिनिधी)

प्रकाश विभाग चालवतोय कोण ?
खुद्द महापौरच शहरातील प्रकाश व्यवस्थेबद्दल हतबल होत असतील तर प्रकाश विभाग चालवतोय कोण, असा सवाल भाजपचे तुषार भारतीय यांनी उपस्थित केला. त्यावर महापौरांचे हतबलतेबद्दलचे वक्तव्य चुकीचे असल्याचे मत विलास इंगोले यांनी व्यक्त केले. महापौर म्हणून आपल्याला विशेषाधिकार आहे. तुम्ही आयुक्तांना आपल्या कक्षात बोलावून घेऊन त्यांना निर्देश देऊ शकता, त्यामुळे जाहीरपणे खंत व्यक्त करणे चुकीचे असल्याचा घरचा अहेर इंगोले यांनी महापौरांना दिला.

विलास इंगोले म्हणाले, सुपारी घेतली काय?
प्रकाश विभागातील अधिकारी आणि एकंदरित कामकाजावर घणाघाती चर्चा सुरू असताना माजी महापौर विलास इंगोले चर्चेत सहभागी झाले. त्यांनी प्रशासनाला धारेवर धरत थेट 'सुपारी' असा शब्दप्रयोग केला.२५ वर्षे जे केले नाही ते करायला लावू नका, अन्यथा निलंबनाचा प्रस्ताव आणावा लागेल, असा दम त्यांनी प्रकाश विभागातील अभियंत्याला दिला. आपण अपघाताची सुपारी घेतली का, अशी विचारणा त्यांनी त्या अभियंत्याकडे अंगुलीनिर्देशाने केली.

Web Title: In the municipal corporation, there was a rage on the light, the general meeting was held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.