अमरावती: केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांमधील जाचक अटींमुळे पीओपी मूर्तींवर बंदी येण्याची शक्यता आहे. ही बंदी आणू नये, या मागणीसाठी मंगळवारी जिल्ह्यातील शेकडो मूर्तिकारांनी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला. यावेळी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे पाठविले आहे.
केंद्राच्या नव्या प्रदूषण मंडळाच्या जाचक अटी-शर्तींमुळे पीओपी मूर्ती बंद झाल्यास मूर्तिकारांवर बेरोजगारीचे संकट कोसळणार आहे. ही बंदी येऊ नये म्हणून मूर्तिकारशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हातात भगवे झेंडे, पत्रके, बॅनर घेऊन मोर्चात सहभागी झाले. ‘पीओपी तारक आहे, मारक नाही’, ‘पीओपी शेतजमिनीचा पोत सुधारण्यासाठी वापरतात’, ‘३६५ दिवसांत एका दिवसाने माझ्यामुळे प्रदूषण का?’ असे फलक मोर्चेकऱ्यांनी हाती घेत नाराजी व्यक्त केली. ही बाब लक्षात घेता, केंद्र सरकारने पीओपी बंदीच्या निर्णयाचा पुनर्विचार करून मूर्तिकारांची बाजू जाणून घ्यावी. कुंभार समाजाला शासकीय जागा देण्यात यावी. मूर्तिकरांना सरकार योजनांचा लाभ द्यावा. मूर्तिकारांचे बचत गट तयार करून त्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे. मूर्तिकारांना मूर्ती विक्रीकरिता निश्चित जागा देण्यात यावी. कुंभार समाजातील ६० वर्षांवरील कारागिरांना पेन्शन सुरू करावी. संत गोरोबाकाका जन्मस्थान तेरढोकीला ‘अ’ दर्जा देण्यात यावा आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. यावेळी विदर्भ मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष गजानन गुजरे, उपाध्यक्ष सुरेश चिंचोरकर, सचिन काेळेश्वर, गाैरव चांदूरकर, विजय गुजरे, राहुल अजमिरे, विजय ढोले, चेतन डहाणे, निकेश सूर्यवंशी, बंडू कंचनपुरे, विनायक बावस्कर, नीलेश पेंढारकर, रमेश चिल्लोरे, संदीप अनकुले, निशांत धकाते यांच्यासह मोठ्या संख्येने कुंभार समाजबांधव सहभागी झाले होते.