अमरावती : ममहापालिकेत उपायुक्त (सामान्य) या पदासाठी संगीत खूर्चीचा खेळ सध्या सुरू आहे. ऑगस्ट २०१९ पासून चार उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली. त्यातील दोन नियमित अधिकारी होते. ते येथे फारसे रमले नाहीत. त्यामुळे पुन्हा पद रिक्त झाल्याने प्रभारीराज सुरू झाले आहे.
महापालिकेत उपायुक्त प्रशासन व सामान्य ही दोन महत्त्वाची पदे आत्त. प्रशासनातील सर्वच विभागांचा कारभार यांच्या अधिनस्त चालतो व यावर आयुक्तांचे नियंत्रण असते. ५ ऑगस्ट २०१९ ला विजय खोराटे यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर दहा महिन्यातच त्यांचे स्थानांतर झाले. त्यानंतर या पदाचा प्रभार उपायुक्त (प्रशासन) सुरेश पाटील यांच्याकडे देण्यात आला. तब्बल पाच महिने हा प्रभार होता. दरम्यान या पदावर नियुक्तीसाठी प्रशासन विरुद्ध पदाधिकारी असा संघर्ष अनुभवाला आलेला आहे.
ठरावाद्वारे करण्यात आलेल्या उपायुक्तांच्या निवडीचा ठराव आयुक्तांनी विखंडणासाठी शासनाकडे पाठविला होता. व त्यानंतर सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे यांना आयुक्तांनी प्रभार सोपविला होता. त्यानंतर ८ फेब्रुवारी २०२१ मध्ये रवि पवार यांची उपायक्तपदी नियुक्ती शासनाने केली होती. आता या महिन्यात त्यांचे देखील स्थानांतरण झाल्याने पुन्हा प्रभार उपायुक्त (प्रशासन) यांच्याकडे देण्यात आलेला आहे. त्यामुळे आयुक्त कुणाकडे या पदाचा प्रभार सोपवितात याकडे शहराचे लक्ष लागले आहे.