बाळासाहेब, उद्धव यांच्यातील वाद झाकण्यासाठी नारायण राणेंनी शिवसेना सोडली, नितेश राणे यांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 08:02 PM2017-12-21T20:02:00+5:302017-12-21T20:03:00+5:30
शिवसेनेत पैसे देऊन तिकीट विकल्या जातात, अशी तक्रार माझे पिता नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुखांकडे केली होती. पण, त्याची दखल घेण्यात आली नाही. बाळासाहेब व उद्धव ठाकरे यांच्यात वाद झाकण्यासाठीच त्यांनी शिवसेना सोडली, असा गौप्यस्फोट यावेळी आ. नितेश राणे यांनी केला.
अमरावती : शिवसेनेत पैसे देऊन तिकीट विकल्या जातात, अशी तक्रार माझे पिता नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुखांकडे केली होती. पण, त्याची दखल घेण्यात आली नाही. बाळासाहेब व उद्धव ठाकरे यांच्यात वाद झाकण्यासाठीच त्यांनी शिवसेना सोडली, असा गौप्यस्फोट यावेळी आ. नितेश राणे यांनी केला.
जुन्या कॉटन मार्केटनजीक एका हॉटेलमध्ये पार पडलेल्या पत्रपरिषदेमध्ये आ. नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राणेसाहेबांवर लोकांचा विश्वास आहे. त्यांचे नेतृत्व उभ्या महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. आम्ही राणेसाहेबांचेच कार्यकर्ते आहोत. त्यांनी भाजपसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवून महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली. जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत. मी जरी काँग्रेसचा आमदार असलोे तरी या पक्षाचे काही जण माझ्यावर कारवाईची प्रतीक्षा करीत आहेत. आम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन राजीनामा देऊ. शिवसेनेसारखे राजीनामे खिशात घेऊन फिरत नाही. योग्य वेळ आली की, समर्थकांचेही राजीनामे होतील, असा टोलाही महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते आमदार नितेश राणे लगावला.
राज्यात नारायण राणे साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे. म्हणूनच महाराष्ट्र स्वाभिमानी संघटनेचा पक्ष झाला. मी पक्षाचे ट्रेलर घेऊन आलो असून, संपूर्ण पिक्चर १८ फेब्रुवारीला अमरावतीत आयोजित जाहीर सभेत राणेसाहेब स्पष्ट करणार आहेत. या सभेतून पक्षाची पुढील दिशा ठरणार असल्याचेही नितेश राणे यांनी स्पष्ट केले.
नारायण राणे यांना मंत्री न केल्यास भाजपसोबत त्यांचा पक्ष मैत्रीपूर्ण संबध ठेवणार का, यासंदर्भात छेडले असता, त्यांनी सर्वच महत्वाच्या पदांवर काम केले आहे. ३९ वर्षे शिवसेनेत व दहा वर्षे काँग्रेसमध्ये ते होते. त्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठीच त्यांचे नेतृत्व असल्याचे आ. नितेश राणे यांनी ठणकावून सांगितले.
पत्रपरिषदेला महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते सिद्धार्थ वानखडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पत्रपरिषदेला आ. नितेश राणे दीड तास उशिरा येऊन पत्रकारांना ताटकळत ठेवले.