राष्ट्रीयीकृत बँकांचा पीककर्ज वाटपास ठेंगा

By admin | Published: May 26, 2017 01:40 AM2017-05-26T01:40:45+5:302017-05-26T01:40:45+5:30

यंदाचा खरीप हंगाम दोन आठवड्यांवर आला आहे. खरीप कर्जवाटपास बँकांचे सहकार्य नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ १३ टक्केच कर्जवाटप झाले आहे.

Nationalized banks will be able to get the crop loans | राष्ट्रीयीकृत बँकांचा पीककर्ज वाटपास ठेंगा

राष्ट्रीयीकृत बँकांचा पीककर्ज वाटपास ठेंगा

Next

खरीप हंगाम तोंडावर : केवळ तीन टक्केच कर्जवाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाचा खरीप हंगाम दोन आठवड्यांवर आला आहे. खरीप कर्जवाटपास बँकांचे सहकार्य नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ १३ टक्केच कर्जवाटप झाले आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृ त बँकानी केवळ तीन टक्केच कर्जवाटप केले आहे. तुरीचे चुकारे महिनाभर होत नाही. खरिपासाठी बी-बियाणे, खते आदींची तजवीज करायची आहे. मात्र, कर्जवाटपास बँकांनी हात वर केल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बँकाना १,५९२ कोटी ५४ लाख ८० हजार रूपयांचा लक्षांक आहे. यामध्ये जिल्हा सहकारी बँकेला ५१६ कोटी ६० लाख, राष्ट्रीयीकृत बँकाना १,०६२ कोटी ६ लाख ५४ हजार व ग्रामीण बँकाना १३ कोटी ८८ लाख २६ हजार रूपयांचा लक्षांक दिला आहेत. प्रत्यक्षात आतापर्यंत यासर्व बँकांनी १९ हजार ४७२ शेतकऱ्यांना १९९ कोटी ७१ लाखांचे खरीप पीककर्ज वाटप केले आहे. यामध्ये जिल्हा बँकेने १६ हजार ५२९ शेतकऱ्यांना २९ हजार ८५७ हेक्टरसाठी १६४ कोटी ६७ लाख म्हणजेच ३२ टक्के, राष्ट्रीयीकृत बँकेव्दारा दोन हजार ७८५ शेतकऱ्यांना ३३ कोटी ६३ लाख म्हणजेच लक्षांकाच्या केवळ तीन टक्के व ग्रामीण बँकानी १५८ शेतकऱ्यांना एक कोटी ४१ लाख रूपयांचे कर्जवाटप केले आहे.
कर्जमाफीच्या चर्चेने जिल्ह्यातील किमान अडीच लाख शेतकऱ्यांनी नियमित कर्जाचा भरणा केलेला नाही. यामुळे हे सर्व शेतकरी बँकांचे थकबाकीदार झालेत व त्यांना नव्याने कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. शासनाने या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज मिळावे, यासाठी शासनस्तरावर समितीचे गठन केले. या समितीचा अहवाल याआठवड्यात शासनाला प्राप्त होणार आहे. तोवर थकबाकीदार शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यास बँकानी हात वर केले आहेत. त्यामुळे खरिपाच्या तोंडावर शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.
वारंवार आस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करणारा शेतकरी आता पुरता जेरीस आला आहे. बँकांनी कर्जवाटपाबद्दल हात वर केल्याने यंदाच्या खरीप हंगामातही शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पीककर्ज न मिळाल्यास खरीप हंगाम कसा भागणार, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

जिल्ह्यातील बँकांची सद्यस्थिती
जिल्ह्यात एकूण चार लाख १५ हजार ८५३ खातेदार आहेत. यापैकी तीन लाख ९८ हजार ६०१ सभासद आहेत. यामधील एक लाख ६५ हजार ७७१ शेतकऱ्यांनी मागील वर्षी कर्ज घतले आहे. प्रत्यक्षात एक लाख ६७ हजार ४२६ शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा न केल्यामुळे ते थकबाकीदार आहेत. सद्यस्थितीत तीन लाख ३३ हजार १९७ शेतकरी कर्जदार आहेत. अद्याप ६१ हजार ३८३ शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले नाही तर १७ हजार २५७ शेतकरी अद्याप बँकांचे सभासद झालेले नाहीत.

जिल्हा बँकेचा शिखर बँकेकडे २५० कोटींचा फेरकर्जाचा प्रस्ताव
जिल्हा बँकेला यंदा ६३१ कोटींच्या कर्जवाटपाचा लक्षांक आहे. तीन वर्षांपासून आणेवारी ५० पैशांच्या आत असल्याने पीककर्जाचे पुनर्गठन होत आहे. यंदा कर्जमाफीच्या चर्चेने कर्जवसुलीवर परिणाम झाला. त्यामुळे जे सभासद कर्जाचा भरणा करीत आहेत, त्यांनाच कर्जवाटप करण्यात येत आहे. बँकेने पीककर्ज वाटपासाठी राज्य सहकारी बँकेकडे २५० कोटींच्या फेरकर्जाचा प्रस्ताव सादर केला आहे.याप्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

Web Title: Nationalized banks will be able to get the crop loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.