राष्ट्रसंतांच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी पर्वाला आजपासून प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 10:46 PM2018-10-22T22:46:47+5:302018-10-22T22:47:02+5:30
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी महोत्सव २३ ते ३० आॅक्टोबरपर्यंत श्रीक्षेत्र गुरूकुंज आश्रम येथे आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये भावपूर्ण मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम २९ आॅक्टोबरला होणार आहे. यावेळी राज्यातील भाविक मंडळी, राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहतील. ३० आॅक्टोबरला गोपालकाला व व्यायाम प्रात्यक्षिक सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता होईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोझरी/तिवसा : राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी महोत्सव २३ ते ३० आॅक्टोबरपर्यंत श्रीक्षेत्र गुरूकुंज आश्रम येथे आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये भावपूर्ण मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम २९ आॅक्टोबरला होणार आहे. यावेळी राज्यातील भाविक मंडळी, राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहतील. ३० आॅक्टोबरला गोपालकाला व व्यायाम प्रात्यक्षिक सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता होईल.
सर्वधर्म समभावाचे प्रतीक असणाऱ्या श्रीक्षेत्र गुरूकुंज येथे राष्ट्रसंतांच्या या पुण्यतिथी महोत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झालेली आहे. यावर्षी सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी समारंभ असल्यामुळे भाविकांची गर्दी वाढणार असल्याने मुख्य मंडपाचा विस्तार करण्यात आला आहे. दोन उपमंडप यावेळी तयार करण्यात आले आहेत. या महोत्सवात विविध प्रकारचे सामाजिक, धार्मिक, प्रबोधनात्मक, प्रकट मुलाखत, युवक संमेलन, शाहिरी लोकरंग व वादविवाद स्पर्धा आदी कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला. या सोहळ्याला लाखो भक्त वाजतगाजत पालखी दिंड्यांसह श्रीक्षेत्र गुरूकुंज येथे येणार असल्याने भव्य मंडप उभारून पालख्यांची व निवासांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. पुण्यतिथी महोत्सवात दररोज सकाळी ५.३० ते ६.३० या वेळात सामुदायिक ध्यानावर अॅड. सचिन देव, मंदा देशमुख, विलास साबळे, श्रीमती राजयोगिनी सितादिदी, ज्ञानेश्वरी दिदी, अॅड. दिलीप कोहळे, सुश्री रामप्रियाजी, प्रकाश वाघ आपले चिंतन व्यक्त करतील. दररोज सकाळी ७ ते ८ या वेळात योगाचार्य रामचंद्र गरड योगासन व प्राणायामचे प्रशिक्षण देणार आहे. शरीर स्वास्थ्य मार्गदर्शन करणार आहे. सकाळी ८.३० ते ९.३० या वेळात माणिक येलचेलवार, नलिनी वेरूळकर, विठ्ठलराव काठोळे, एकनाथ राऊत, राम सातेगावकर ग्रामगीता प्रवचन करतील. दररोज सायंकाळी ६ ते ७ या वेळात सामुदायिक प्रार्थना व प्रार्थनेच्या महत्त्वावर गुलाचंद्र खोब्रागडे, सुभाष सावरकर, सतीश तराळ, प्रा. स्वप्निल इंगोले, पुष्पा बोंडे, प्रवीणसिंह परदेशी, उपसर्वाधिकारी लक्ष्मण गमे आपले मनोगत व्यक्त करतील.
मंगळवारी पहाटे ४.३० वाजता तीर्थस्थापना
सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवाची सुरूवात २३ आॅक्टोबरला पहाटे ४.३० वाजता तीर्थस्थापना व चरणपादुका पूजनाने होईल. राजेंद्र कठाळे, सुभाष नेमाडे, वासुदेव कुरवाडे, राजेंद्र चव्हाण अखंड वीणा वादनास प्रारंभ करतील. त्यानंतर राष्टÑसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा मानकर स्वामी (आळंदी) यांच्या संयोजनाखाली काढण्यात येईल. दुपारी १२ ते ३ सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवी उद्घाटन कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री प्रवीण पोटे, खा. आनंदराव अडसूळ, आ. यशोमती ठाकूर, आ. किर्तीकुमार भांगडीया यांना निमंत्रित करण्यात आले आहे.