‘नवाब’ स्वगृही परतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:20 AM2018-02-20T00:20:06+5:302018-02-20T00:20:33+5:30
पोहरा-चिरोडी जंगलात गत दोन वर्षांपूर्वी बोर अभयारण्यातून स्थलांतरित असलेला नवाब नावाचा वाघ हा काही दिवसांपासून कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये कैद झाला नाही.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : पोहरा-चिरोडी जंगलात गत दोन वर्षांपूर्वी बोर अभयारण्यातून स्थलांतरित असलेला नवाब नावाचा वाघ हा काही दिवसांपासून कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये कैद झाला नाही. परिणामी तो स्वगृही परतला असावा, असा दावा वनविभागाने केला आहेत. तसेही वर्षभरापूर्वी तो बोर अभयारण्यात जाऊन परत आला होता, हे विशेष.
अमरावतीलगत वडाळी, पोहरा, चिरोडी व मालखेड परिसरातील जंगल हे वैभव आहे. या परिसरात वन्यपशू, प्राण्यांसह वनसंपदा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या विस्तीर्ण जंगलाचे कॅरिडोर असलेले बोर अभयारण्य आणि कळमेश्वर येथून वाघ, बिबट स्थलांतरित होत असल्याचे अनेकदा घडले आहे. यापूर्वी बोर अभयारण्यातून चिरोडी- पोहरा जंगलात आलेल्या वाघिणीने सहा महिने वास्तव्य केल्यानंतर ती परतली होती. मात्र, चार ते साडेचार वर्षाचा असलेल्या नवाबने चक्क दोन वर्षे चिरोडी- पोहरा जंगलात मुक्काम ठोकल्याची नोंद वनविभागाने घेतली आहे. वनविभागाने नवाबची काळजी घेताना कोणत्याही प्रकारची उणिवा ठेवली नाही. पोहरा- चिरोडी जंगलात त्याच्या वास्तव्याचे ठिकाण, आहाराची काळजी घेताना अन्य वन्यपशुंवरही करडी नजर ठेवली. नवाबच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जंगलात महत्वाच्या ठिकाणी कॅमेरा ट्रॅपिंग लावण्यात आले होते. विशेषत: जलाशय परिसर, पानवठे, शिकारीचे स्थळ आदी ठिकाणी कॅमेºयांची त्याचेवर नजर होती.
एवढेच नव्हे तर उपवनसंरक्षक हेमंत मिणा हे रात्री-अपरात्री पोहरा, वडाळी, चिरोडी जंगलात आस्कमिक भेट देऊन कॅमेरा ट्रॅपिंगद्वारे नवाबचे लोकेशन घेत होते. त्यामुळे निसर्गप्रेमींनाही नवाब असल्याबाबत सुखद आनंद होता. परंतु, गत महिन्याभरापासून नवाब कॅमेºयात कैद झाला नसल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. तो स्थलांतरित वाघ असल्याचे पुन्हा बोर अभयारण्यात परत गेला, असा दावादेखील वनविभागाने केला आहे. त्यानुसार नवाब स्थलांतरित झाल्याचा अहवाल उपवनसंरक्षकांनी वन्यजीव विभागाकडे पाठविला आहे.
जोडीदाराच्या शोधात झाले असावे स्थलांतर
पोहरा- चिरोडी जंगलात गत दोन वर्षांपासून बिनधास्तपणे रमलेला नवाब वाघाचे वय चार ते साडेचार वर्षे आहे. या वयानंतर वाघ अथवा वाघीण मिलनासाठी जोडीदार शोधतात. त्यामुळे नवाब हा जोडीदाराचा शोधात बोर अभयारण्य, कळमेश्वर येथे स्थलांतरीत झाला असावा, असा ठाम विश्वास वनविभागाने व्यक्त केला आहे. मुळात वाघ हा प्राणी एकटा राहू शकत नाही. तो जोडीदारसाठी भटकंती करतो, असे वन्यजीव अभ्यासक यादव तरटे यांचे म्हणणे आहे.
टी-२ म्हणजे नवाब हा वाघ अलीकडे कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये कैद झाला नाही. वडाळी, चिरोडी जंगलातील संपूर्ण कॅमेºयांची तपासणी करण्यात आली आहे. याबाबत वरिष्ठांकडे अहवाल पाठविला आहे.
- हेमंत मीणा
उपवनसंरक्षक, अमरावती.