भातकुली तालुक्यात साडेनऊ हजार क्विंटल बियाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:12 AM2021-04-22T04:12:15+5:302021-04-22T04:12:15+5:30
टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यात खरीप हंगामातील सोयाबीन हे प्रमुख पीक असून, सरासरी २८ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी ...
टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यात खरीप हंगामातील सोयाबीन हे प्रमुख पीक असून, सरासरी २८ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली जाते. सद्यस्थितीत तालुक्यात शेतकऱ्यांकडे ९,५४० क्विंटल घरगुती बियाणे उपलब्ध असून, १४,९२५ क्विंटल बियाण्यांचा तुटवडा आहे. खरीप हंगामात सोयाबीन पिकांना अवेळी पावसामुळे फटका बसला. त्यामुळे सोयाबीन बियाण्याची गुणवत्ता खराब झाली. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी घरचे सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासूनच पेरावे, असे आवाहन तालुका कृषी विभागामार्फत करण्यात आले.
चांगल्या स्थितीत सोयाबीन उपलब्ध असलेल्या त्याची विक्री न करता ते बियाणे म्हणून पेरणीकरिता वापरावे. बियाण्यांची पेरणी करताना सर्वप्रथम उगवणक्षमता तपासणी करून बियाणे पेरणी योग्य असल्याची खात्री करावी व जिवाणू संघाची बीजप्रक्रिया घ्यावी. पेरणी तीन-चार सेमी इतक्या खोलीवर करावी. ७५-१०० मिमी इतका पुरेसा पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी. बीबीएफ तसेच पट्टा पद्धतीचा अवलंब केल्यास बियाण्यांत बचत व उत्पादनात वाढ होते. किमान ७० टक्के उगवणक्षमता असलेले बियाणे पेरणी योग्य समजावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मुक्ता कोकाटे पंडित यांनी केले आहे.