आता प्रत्येक महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:11 AM2021-01-02T04:11:20+5:302021-01-02T04:11:20+5:30

समन्वयक नियुक्तीच्या प्राचार्यांना सूचना, अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांना अनिवार्य अमरावती : केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात ...

Now competition examination guidance center in every college | आता प्रत्येक महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

आता प्रत्येक महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

Next

समन्वयक नियुक्तीच्या प्राचार्यांना सूचना, अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांना अनिवार्य

अमरावती : केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या प्रशासकीय सेवापूर्व परीक्षेत मुलांचे प्रमाण वाढावे, यासाठी आता प्रत्येक महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन केले जाणार आहे. यासंदर्भात स्पर्धा परीक्षांसाठी सहायक प्राध्यापकांची समन्वयक म्हणून नियुक्ती करणे बंधनकारक केले आहे. विभागस्तरावर उच्च शिक्षण सहसंचालकांनी प्राचार्यांना याअनुषंगाने पत्रव्यवहार चालविला आहे.

राज्याचे उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांनी १७ नोव्हेंबर २०२० रोजी जारी केलेल्या पत्रावरून महाविद्यालयांमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यासाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. शासकीय अनुदानित विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालयांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करणे आणि समन्वकांची नियुक्ती करून ई-मेलवर महाविद्यालयांना गुगल शीटवर माहिती मागविली आहे. राज्यात एकूण १३७२ अनुदानित महाविद्यालये आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत ३८६ महाविद्यालये असून, १५२ अनुदानित महाविद्यालये आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि समन्वयक नियुक्तीची माहिती शासनाने तात्काळ मागविली आहे.

-------------------

स्पर्धा परीक्षा केंद्रातून ही मिळेल माहिती

महाविद्यालयात स्थापन होणाऱ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून विद्यार्थ्यांना यूपीएसी, एमपीएसी परीक्षांची माहिती दिली जाईल. मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहित केले जाईल. जास्तीत जास्त अर्ज भरून घेण्यासाठी समन्वयक सहकार्य करतील. विद्यापीठ स्तरावर गठित समितीमार्फत नियंत्रण केले जाणार आहे.

-----------------------

प्रत्येक महाविद्यालयाला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करणे बंधनकारक केले आहे. यात यूपीएससी, एमसीएससी परीक्षांविषयी विद्यार्थ्यांना इत्थंभूत माहिती मिळेल. समन्वयक म्हणून नियुक्त सहायक प्राध्यापकांना कोणतेही मानधन, विशेष वेतन मिळणार नाही.

- केशव तुपे, सहसंचालक, उच्च शिक्षण अमरावती विभाग.

Web Title: Now competition examination guidance center in every college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.