आता लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 10:55 AM2024-11-27T10:55:11+5:302024-11-27T10:56:26+5:30
निवडणुकीत महायुतीला विक्रमी कौल : दीड हजार, की २१०० रुपये
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विधानसभा निवडणुकीत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' गेमचेंजर ठरल्याने, महायुती सरकार विक्रमी मताधिक्याने पुन्हा एकदा सत्तेवर आले. लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केल्याने, महायुतीला भरघोस विजय साजरा करणे शक्य झाले. आता लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची प्रतीक्षा असून, तो खात्यात कधी जमा होणार याची चर्चा रंगत आहे. आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत.
जुलै २०२४ पासून सुरू करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत मुदतीपर्यंत जिल्ह्यात ६ लाख ९९ हजार ७१६ महिला पात्र ठरल्या आहेत. पात्र ठरलेल्या बहुतांश महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला आणि दुसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील हप्ताही काही दिवसांच्या फरकाने महिलांच्या खात्यात जमा झाला. तसेच नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागू होणार असल्याने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे एकत्रित पैसे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या खात्यात जमा केले होते. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यावर आतापर्यंत पाच हप्त्यांचे साडेसात हजार जमा झाले आहेत.
दरम्यान, आचारसंहिता काळात योजनांचा लाभ देता येत नसल्याने, निवडणुका संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता निवडणुका आटोपल्या सून, लाडक्या बहिणींच्या खात्यात सहावा हप्ता कधी जमा होणार? याची प्रतीक्षा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना लागली आहे.
मदत वाढविणार असल्याची चर्चा
महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजारांवरून २१०० रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते. आता महायुतीचे सरकार आल्याने, लाडकी बहीण योजनेचा हप्ता २१०० रुपये होणार का, अशीही चर्चा बहिणींमध्ये रंगत आहे. दरम्यान, हा धोरणात्मक निर्णय असल्याने मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटच्या बैठकीतच याबाबतचा निर्णय होणे अपेक्षित असल्याने, डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये दिल्यास तो दीड हजारांप्रमाणेच दिला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.