शिक्षक मतदार यादीत झेडपी हायस्कूल व विद्यालयांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:18 AM2020-12-05T04:18:36+5:302020-12-05T04:18:36+5:30

परतवाडा : शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२० मध्ये प्राथमिक शिक्षकांच्या मतदार नोंदणीमुळे अचलपूरसह जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या हायस्कूलसह विद्यालयांची संख्या वाढली ...

The number of ZP high schools and schools in the teacher voter list has increased | शिक्षक मतदार यादीत झेडपी हायस्कूल व विद्यालयांची संख्या वाढली

शिक्षक मतदार यादीत झेडपी हायस्कूल व विद्यालयांची संख्या वाढली

Next

परतवाडा : शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२० मध्ये प्राथमिक शिक्षकांच्या मतदार नोंदणीमुळे अचलपूरसह जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या हायस्कूलसह विद्यालयांची संख्या वाढली आहे.

अचलपूर पंचायत समिती अंतर्गत अचलपूर शहरात एकमेव जिल्हा परिषद हायस्कूल आहे. या व्यतिरिक्त अचलपूर तालुक्यात कुठेही जिल्हा परिषदेचे हायस्कूल नाही. दरम्यान निवडणूक विभागाकडून प्रसारीत मतदार यादीतील भाग क्रमांक पाचमध्ये जि. प. हायस्कूल चमक खुर्द व जि. प. हायस्कूल गौरखेडा कुंभी आणि भाग सहामध्ये जि. प. हायस्कूल उपातखेडा व गोंडवाघोली अस्तित्वात आले आहे.

अचलपूर पंचायत समितीत एकही जि. प. विद्यालय नाही, असे असतानाही मतदार यादीत सावळापूर, मल्हारा, धामणी, कोल्हा, धोतरखेडा येथे जि. प. विद्यालय म्हणून मतदार असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या नावापुढे नमूद आहे.

दरम्यान महाराष्ट्र राज्य पदविधर शिक्षक व केंद्रप्रमुख सभा संघटनेचे राज्याध्यक्ष उमेश गोदे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यात ७९४, यवतमाळ जिल्ह्यात ४००, अकोला जिल्ह्यात ४२५ व वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील काही अशा एकूण १७०० ते १८०० प्राथमिक शिक्षकांनी शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मतदार म्हणून नोंदणी केली आहे. हे प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक असून वर्ग ६ ते ८ ला शिकवीत असल्याचे गोदे यांनी सांगितले. यात या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या शाळेचा दर्जा मात्र उच्च प्राथमिक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आरटीई ॲक्टनुसार वर्ग ६ ते ८ वर्गाला शिकवित असल्यामुळे प्राथमिक पदवीधर शिक्षकांनी शिक्षक मतदारसंघात मतनोंदणी केल्याचेही ते म्हणाले.

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी मतदान केल्यामुळे शिक्षक मतदारांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. यात तालुका आणि उपविभागीय पातळीवर मतदार नोंदणी अर्ज स्वीकारून नोंदणी करणारी यंत्रणा काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारताच्या संविधान कलम १७१ (३) (ग) नुसार माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा खालचा दर्जा नसलेल्या शाळांमधील शिक्षकांनाच मतदानाचा अधिकार असल्यामुळे माध्यमिक शाळांचा दर्जा नसलेल्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी निवडणुकीत मतदान केल्यामुळे शिक्षण क्षेत्र ढवळून निघाले आहे.

कोट

जिल्हा परिषद शिक्षण क्षेत्रात जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसह प्राथमिक व उच्च प्राथमिक अशा शाळा आहेत. जिल्हा परिषद विद्यालय नाहीत.

- एजाज खान, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जि. प. अमरावती.

कोट

अचलपूर पंचायत समिती अंतर्गत अचलपूरला जि. प. चे एक हायस्कूल आहे. या व्यतिरिक्त तालुक्यात जिल्हा परिषदेचे कुठेही हायस्कूल नाही. जिल्हा परिषद विद्यालय एकही नाही. हायस्कूल वगळता तालुक्यात जि. प. च्या कुठल्याही शाळेला माध्यमिकचा दर्जा प्राप्त नाही.

- रुपराव सावरकर

गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, अचलपूर.

Web Title: The number of ZP high schools and schools in the teacher voter list has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.