मेळघाटात गाविलगड किल्ल्याच्या पायथ्याशी अष्टकोनी विहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:10 AM2021-05-29T04:10:53+5:302021-05-29T04:10:53+5:30
फोटो पी २८ गाविलगड पान ३ चे बाॅटम चिखलदरा : विदर्भाच्या इतिहासात किल्ले गाविलगडचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कितीतरी ...
फोटो पी २८ गाविलगड
पान ३ चे बाॅटम
चिखलदरा : विदर्भाच्या इतिहासात किल्ले गाविलगडचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कितीतरी वास्तू अजूनही किल्ले गाविलगडच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देत एखाद्या तपस्वीप्रमाणे किर्र जंगलात स्तब्ध उभ्या आहेत. या किल्ल्याच्या पायथ्याशी अष्टकोनी विहीर आढळली आहे.
पाच वर्षांपासून जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूचे जतन आणि संवर्धनासाठी तसेच दुर्लक्षित ऐतिहासिक वास्तू शोधून त्या जनसामान्यांच्या माहितीसाठी समर्पित कराव्या, या उद्देशाने स्वराज्य सेवा प्रतिष्ठान कार्यरत आहे. मेळघाटच्या जंगलात अविरत भ्रमंती करून दडलेल्या वास्तू शोधून त्यांची माहिती जमा करण्याचे काम हे ध्येयवेडे करीत आहेत.
युगुलकुमार घोरे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे तरुण बुद्धपौर्णिमेला गाविलगडच्या पायथ्याशी भग्न अवशेष पाहण्यासाठी भ्रमंती करीत होते. शिवा काळे, इतिहास व वन्यजीव अभ्यासक डॉ. जयंत वडतकर, लेखक डॉ. एकनाथ तट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शोधमोहीम राबविली. बनलापूर जवळ असलेल्या सोलामोह या गावातील जंगलात ही शोधमोहीम सुरू असता, या गावाच्या शिवारात जुनी घुमट असलेली मजार आढळून आली. त्या शेजारी एक पायाविहिर असल्याचे दृष्टीस पडले. ही पायाविहिर अष्टकोनी आकारात कोरलेली असून विहिरीत उतरायला चारही बाजूने पायऱ्या व कमानी युक्त दरवाजे आहेत. विहिरीत उतरायला पायऱ्यांची व्यवस्था छान आहे. विहिरीच्या आत कमानी आणि बसायला खोलीची व्यवस्था आहे. त्यावर सुंदर आणि सुबक असे कोरीव काम आहे. या विहिरींची भव्यता लक्षात घेता, पूर्वीच्या काळी महत्त्वाच्या घराण्याची पाणवठ्याची व्यवस्था असावी, असे मत व्यक्त करण्यात आले.
गौरवशाली इतिहास यावा समोर
ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन व्हावे तसेच स्थानिकांना या वास्तुविषयी व इतिहासाविषयी असणारी अनास्था दूर व्हावी, वैभवशाली आणि गौरवशाली इतिहास सर्वांसमोर यावा, अशी मागणी स्वराज्य सेवा प्रतिष्ठानने केली आहे.