अंगणवाडीतील पूरक आहारातून तेल गायब, चणे शिजतच नाही, वाटपाच्या प्रमाणातही घालमेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:16 AM2021-09-06T04:16:07+5:302021-09-06T04:16:07+5:30
परतवाडा : अंगणवाडीतून वितरित केल्या जाणाऱ्या पूरक आहारातून तेल गायब झाले आहे. या तेलाऐवजी ते साखर देत आहेत. दिल्या ...
परतवाडा : अंगणवाडीतून वितरित केल्या जाणाऱ्या पूरक आहारातून तेल गायब झाले आहे. या तेलाऐवजी ते साखर देत आहेत. दिल्या जाणारी साखर अत्यंत बारीक असून, चणे निकृष्ट दर्जाचे आहेत. या चण्यांमध्ये न शिजणारे अधिक असून आकारानेही ते बारीक आहेत. भिजायला टाकल्यानंतर किंवा शिजायला ठेवल्यानंतर हे चणे भिजतच नाहीत, शिजतही नाहीत.
आहारासोबत दिले जाणारे तेल बंद केल्यामुळे आहार शिजवायचा कसा, असा प्रश्न लाभार्थींपुढे निर्माण झाला आहे. बिनातेलाचा आहार खायचा कसा, असा प्रश्नही लाभार्थी उपस्थित करू लागले आहेत. आधीच कोरोनाने आर्थिक घडी विस्कटली असल्यामुळे तेलाशिवाय पोषण आहार लाभार्थींच्या आवाक्याबाहेर आहे. अंगणवाडी पोषण आहारात पूर्वीप्रमाणेच तेलाचा समावेश करावा, अशी मागणी ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थींकडून, पालकांकडून केली जात आहे. आहारात वितरित केली जाणारी मुगाची डाळ निकृष्ट दर्जाची आहे. याविषयी लाभार्थींनी व पालकांनी तक्रारीही केल्या आहेत. यासोबत हळद पावडर, मिरची पावडर वितरित केली जाते. या पावडरमध्ये अन्य घटक मिसळल्या जात असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. मिसळल्या गेलेले ते घटक आरोग्यास हानिकारक ठरत असल्याचे लाभार्थींचे म्हणणे आहे. लाभार्थींना वितरित केल्या जाणाऱ्या बंद पाकिटातील आहाराचे वजन आणि त्याचा दर्जा तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. असे असले तरी संबंधित यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष आहे.