ऑक्सिजन न मिळाल्यानं वृद्धाचा मृत्यू; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 10:22 PM2020-07-26T22:22:28+5:302020-07-26T22:23:56+5:30

डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नातेवाइकांनी घातला गोंधळ 

old man dies after not getting oxygen family alleges negligence of doctors | ऑक्सिजन न मिळाल्यानं वृद्धाचा मृत्यू; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

ऑक्सिजन न मिळाल्यानं वृद्धाचा मृत्यू; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

googlenewsNext

अमरावती : न्यूमोनिया झालेल्या वृद्धाच्या उपचारात ऑक्सिजनचा वापर न झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरल्याचा आरोप करीत संतप्त नातेवाइकांनी गोंधळ घातला. 

रमेश रामचंद्र बोबडे (६५, रा.  पूर्णानगर) असे मृताचे नाव आहे. त्यांना पीडीएमसीमधील ‘सारी’ वॉर्डातील अतिदक्षता विभागात मंगळवारी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती नाजूक असताना व डॉक्टरांना  वारंवार सांगूनही रुग्णाला योग्यवेळी ऑक्सिजन मिळाला नसल्याचा नातेवाइकांचा आक्षेप आहे. रविवारी सांयकाळी ७ च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. यानंतर संतप्त नातेवाइकांनी अधिष्ठाता पद्माकर सोमवंशी यांच्या दालनात गोंधळ घातला. 
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन  गाडगेनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक राम कदम, पोलीस निरीक्षक यादव यांच्यासह ताफा रुग्णालयात पोहोचला. रुग्णाला ऑक्सिजनची गरज होती. मात्र, संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी दखल घेतली नसल्याचे पुतणे प्रवीण बोबडे यांनी सांगितले. त्यामुळे संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नातेवाइकांनी लावून धरली. काही नातेवाइकांनी डॉ. सोमवंशी यांच्याकडे रोख करून शिवीगाळ केली. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी करून त्यांना शांत केले. नेमका काय प्रकार घडला, याची चौकशी करण्यात येईल, असे सांगून पोलीस बंदोबस्तात सारी वॉर्डात भेट देऊन चौकशी केली.
 
नातेवाईकांची अधिष्ठात्यांसोबत बंद दाराआड चर्चा
संतप्त नातेवाइकांनी अधिष्ठाता सोमवंशी यांच्याशी बंदद्वार चर्चा केली. यावेळी पोलीसही उपस्थित होते. डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवीण बोबडे, टिनू काटोलकर, निशांत अग्रवाल, सतीश देशमुख यांनी केली. 

खासगी डॉक्टरांचा नकार
छातीत कफ दाटल्याने अस्वस्थ झालेले रमेश बोबडे यांना तातडीने उपचाराकरिता खासगी डॉक्टरांकडे नेण्यात आले. परंतु, एकाही खासगी हॉस्पिटलने दाखल करून घेतले नाही. अखेर त्यांना मंगळवारी पीडीएमसीमध्ये आणण्यात आले. कोरोनाची रॅपिड अँटिजन टेस्ट ही निगेटिव्ह आली. त्यानंतर सारीचा संशयित म्हणून त्यांना या वॉर्डात ठेवण्यात आले. मात्र, त्याबाबत टेस्ट निगेटिव्ह आली. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेल्याने मृत्यू झाल्याची भावना पुतणे सुधीर बोबडे यांनी व्यक्त केले.
 

Web Title: old man dies after not getting oxygen family alleges negligence of doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.