धामणगाव रेल्वे : धामणगाव शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असून, बगाजी सागरमध्ये कमी पाणी असल्यामुळे शहरवासीयांना आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
सध्या उन्हाळ्यात दिवसेंदिवस विक्रमी तापमानाची नोंद होत आहे. वाढत्या तापमानात घरात कूलर व पिण्यासाठी मुबलक पाण्याची गरज आहे. धामणगाव शहरात एक दिवसआड नळ येत आहेत. शहरात २५ हजार नागरिकांचे वास्तव्य आहे. यात शहरात शिक्षण रोजंदारी नोकरीसाठी १२०० कुटुंब भाड्याने राहतात. ८५ मेन व्हॉल्वमधून एक दिवसआड पाणी सोडले जाते. ज्या बगाजी सागर धरणातून शहराला पाणी मिळते, त्या धरणात अल्प पाणीसाठा असल्याने आगामी काळात दोन दिवसआड पाणी मिळणार आहे. शहरवासीयांना प्रतिमाणसी ७५ लिटर पाणी मिळत असले तरी या पाण्याचा वापर योग्य पद्धतीने होत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.
बॉक्स
एखादी वस्तू मुबलक मिळाली की त्या वस्तूची किंमत कळत नाही, ही माणसाची नैसर्गिक वृत्ती आहे. कपडे धुण्यासाठी अधिक पाणी वापरले जाते. दररोज शॉवरखाली आंघोळ करणाऱ्यांची आकडेवारी अधिक आहे. बकेटीत पाणी घेऊन आंघोळ केल्यास १८ लिटर पाणी खर्च होतो. शॉवरने आंघोळ केल्यास १०० लिटर पाणी लागते. वाहत्या नळाखाली हात धुणे, शौचविधीनंतर फ्लशचा वापर अधिक करणे, अशा चुकीच्या सवयी अनेकांना जडल्याने आगामी काळात धामणगाव शहराला मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
कोट
पालिका हद्दीतील रहिवाशांना आगामी उन्हाळाभर पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी नगरपरिषदेची असली तरी प्रत्येक नागरिकांनी पाणी जपून वापरणे गरजेचे आहे.
- प्रताप अडसड,
आमदार तथा माजी नगराध्यक्ष
धामणगाव रेल्वे
कोट
धामणगावातील २५ हजार नागरिकांना पाणी द्यायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढली आहे. बगाजी सागर धरणातून शहराला कमी पाणीपुरवठा होत आहे.
- प्रशांत उरकुडे,
मुख्याधिकारी, नगर परिषद धामणगाव रेल्वे