अमरावती : शिक्षक आणि विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थित ठेवण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे प्राथमिक शिक्षणाधिकारी एजाज खान यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हा परिषद शाळांमध्ये शंभर टक्के शिक्षक उपस्थित राहण्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहे. प्रामुख्याने शाळेच्या बाबतीत शासनाचे कुठलेही आदेश नाहीत. असे असताना शिक्षकांनी शाळांत १०० टक्के उपस्थित राहावे, असे आदेश शिक्षण विभागाने जारी केले आहे. या आदेशानुसार मग शाळाही शंभर टक्के उघडण्यात याव्यात. तसेच शिक्षकांच्या शंभर टक्के उपस्थितीचा चांगल्या प्रकारे विनियोग करता येईल. असे शिक्षणाधिकाऱ्यांच्या निर्देशनास आणून देत शिक्षक समन्वय समितीने जोपर्यंत शंभर टक्के शाळा उघडत नाही तोपर्यंत सर्व शिक्षकांना शाळेत बोलावण्याचा आग्रह न धरता संपूर्ण राज्यात सुरू असल्याप्रमाणे ५० टक्के शिक्षक उपस्थिती पूर्ववत ठेवावी. ऑनलाईन अध्यापनासाठी आवश्यक विविध प्रकारची संसाधने नसल्याने किमान ५० टक्के शिक्षक घरी राहून स्वखर्चाने वायफाय, इंटरनेट, लॅपटॉप, नोटपॅड आदींचा वापर करून अध्ययन, अध्यापनाची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. याशिवाय सर्व शाळांमध्ये वीज पुरवठा नाही तर शंभर टक्के शिक्षकांना शाळेत बोलावल्यास ऑनलाइन अध्ययन, अध्यापनात व्यत्यय निर्माण होऊ शकतो. सबब शंभर टक्के विद्यार्थ्यांसह शाळा सुरू होईपर्यंत सर्व शिक्षकांना शाळेत बोलवणे योग्य राहणार नाही. या एकंदरीत वस्तुस्थितीचा विचार करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय संघटनेच्यावतीने प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष गोकुळदास राऊत, किरण पाटील, राजेन्द्र दीक्षित, उमेश गोदे, वसीम फरहत, सुनील केने, राजेश गाडे, संजय भेले, अनिल कोल्हे, सुरेंद्र मेटे, उमेश वाघ,छगण चौधरी उपस्थित होते.