मोफत रोपे देण्यासाठी वन मंत्रालयाचे पत्र, रोपे लावणे संवर्धनाची धुरा शाळांवर
अमरावती : यंदा वनमहोत्सव २०२१-२०२२ अंतर्गत राज्यात ५० हजार शाळांमध्ये १० लाख वृक्षलागवड करण्यात येणार आहे. शाळेतील निवडक शिक्षक, विद्यार्थी यांच्या मदतीने ही रोपे लावणे आणि संगोपनाचे नियोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने शाळांना मोफत रोपे देण्याची जबाबदारी वनविभागाकडे सोपविण्यात आली आहे.
राज्य अल्पसंख्याक आयोग १६ ते ३१ जुुलै दरम्यान वृक्षारोपणाने पंधरवडा साजरा करीत आहे. त्याकरिता राज्यात ५० हजार शाळांमधील निवडक शिक्षक, विद्यार्थी यांच्या मदतीने राेपे लावण्यात येतील आणि ती जगविण्याची जबाबदारीदेखील शाळेवरच सोपविली जाणार आहे. रोपे खरेदीसाठी राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे निधी नाही. त्यामुळे शासन धोरणास अधिन राहून संबंधित यंत्रणांना मोफत रोपे देण्याबाबतचे पत्र प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) यांना मंत्रालयातील मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे यांनी २० जुलै रोजी पाठविले आहे. तसेच वनमहोत्सवात शासकीय, प्रशासकीय यंत्रणांनी रोपांची मागणी केल्यास अशा यंत्रणांकडे रोपे खरेदीची तरतूद नसल्यास अशांनाही मोफत रोपे द्यावी, असे पत्रात म्हटले आहे. जिल्हा स्तरावर उपवनसंरक्षक, विभागीय वनाधिकारी (प्रादेशिक, सामाजिक वनीकरण) यांना शाळांना रोपे उपलब्ध करुन द्यावे लागणार आहे.
-----------
वनमहोत्सवाच्या अनुषंगाने वरिष्ठांचे पत्र प्राप्त झाले आहे. शाळा अथवा यंत्रणांच्या मागणीनुसार मोफत रोपे दिले जातील. कुणी रोपे घेऊन गेलेत, तशा नोंदी सुद्धा सामाजिक वनीकरण विभागात ठेवल्या जातील. त्यापैकी किती रोपांचे वृक्षात रुपातंर झाले, याची नोंद ठेवली जाईल.
- नितीन गोंडाणे, प्रभारी उपवनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, अमरावती