लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला येत्या एक ते दोन दिवसांत सुरुवात होत आहे. परंतु सद्य:स्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, कोरोनावर मात करण्यासाठी यावर्षी पवित्र रमजान महिन्यातील नमाज पठणाकरिता मुस्लिम बांधवांनी मशीद अथवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता, घरामध्येच धार्मिक कार्य पार पाडून शासन व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन ठाणेदार दीपक वानखडे यांनी केले आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना असलेल्या रमजानच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात तालुक्यातील मौलवी, काही मुस्लीम बांधवांची बैठक पार पडली. सध्या कोरोना विषाणूची जगभराच्या नागरिकांवर टांगती तलवार लटकली असल्याने तसेच हा संसर्गजन्य आजार असल्याने याची लागण एका व्यक्तीकडून दुस?्या व्यक्तीस त्वरित होते. ही साखळी तोडण्यासाठी नागरिकांना एकत्र येण्यापासून रोखणे हे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. त्यामुळे जमावबंदी व संचारबंदीचे आदेश लागू करून कोरोना विषाणू आटोक्यात आणण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे कोणत्याही स्थितीत मशिदीमध्ये नमाज पठणासाठी एकत्र येऊ नये. घराच्या अथवा इमारतीच्या छतावर एकत्र येऊन नमाजपठण करण्यात येऊ नये. मोकळ्या मैदानावर एकत्र जमून नमाज पठण करू नय. सामाजिक, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम नागरिकांनी एकत्रित करू नये. सर्व मुस्लिम बांधवांनी त्यांच्या घरात नियमित नमाज पठण व धार्मिक कार्यक्रम पार पाडावे तसेच पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत सर्व नागरिकांनी संचारबंदी व जमावबंदीच्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना यावेळी ठाणेदार दीपक वानखडे यांनी दिल्या. उपस्थित मुस्लिम धर्मगुरू, बांधवांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्वांचे योगदान आवश्यक आहे. मुस्लिम धर्मगुरूंनीही मुस्लिम बांधवांना धार्मिक स्थळी एकत्र न येता आपापल्या घरीच राहून नमाज पठण व इतर धार्मिक कार्यक्रम पार पाडण्याबाबत सर्व बांधवांना आवाहन केले. रमजानच्या काळात कोरोना प्रतिबंधक नियम, निर्देशांचे काटेकोर पालन करावे व कोरोनापासून स्वत:चे, कुटुंबाचे, समाजाचे संरक्षण करून एकजूट दाखवावी, असेही ते म्हणाले. यावेळी कारी साजीद साहब, माजी नगरसेवक अनिस सौदागर, सैयद जाकीर, नुरुल हसन कुरेशी, बशीर यांसह अनेकांची उपस्थिती होती.
रमजानमध्ये नमाज पठणासाठी एकत्र येऊ नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 5:00 AM
मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना असलेल्या रमजानच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात तालुक्यातील मौलवी, काही मुस्लीम बांधवांची बैठक पार पडली. सध्या कोरोना विषाणूची जगभराच्या नागरिकांवर टांगती तलवार लटकली असल्याने तसेच हा संसर्गजन्य आजार असल्याने याची लागण एका व्यक्तीकडून दुस?्या व्यक्तीस त्वरित होते. ही साखळी तोडण्यासाठी नागरिकांना एकत्र येण्यापासून रोखणे हे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे.
ठळक मुद्देमुस्लिम बांधवांची बैठक : चांदूर रेल्वेच्या ठाणेदारांकडून दिशानिर्देश