राजुरा बाजार : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला लगाम घालण्यासाठी १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना लस देण्यासाठी शासनाने ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक केले आहे. ते ग्रामीण भागात ऑफलाईन पद्धतीने करण्याची मागणी माजी सरपंच किशोर गोमकाळे यांनी केली आहे.
कोरोनाचा शिरकाव आता ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणावर झालेला असताना, ऑनलाइन रजिस्ट्रेशन अनिवार्य केले आहे. तासनतास बसूनही शेड्यूल बिझी किंवा टारगेट फुल असे मॅसेज येत असल्याने तसेच ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी नेटवर्क, अँड्रॉइड फोन उपलब्ध नसल्याने ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसे होईल, १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना लस कशी मिळेल व देशाचे भविष्य असलेल्या युवा पिढीला लस मिळणार कधी, असा सवाल सामान्य नागरिक विचारीत आहेत.
दोन दिवसांआधी ४५० डोज स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राप्त झाले होते. तेथे ऑनलाइन नोंदणी करणाऱ्यांमध्ये बाहेरगावच्या नागरिकांचा भरणा अधिक असल्याने स्थानिकांना लस मिळाली नाही. ग्रामीण भागात १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना ऑफलाईन पद्धतीने लसीकरण करण्याची मागणी आहे.