दीड लाख लोकसंख्येमागे केवळ चार भंगार रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:09 AM2021-06-21T04:09:46+5:302021-06-21T04:09:46+5:30
मंगेश तायडे नांदगाव पेठ : अमरावती तालुक्यामध्ये चार ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत, तर एका ठिकाणी आरोग्य उपकेंद्र आहे. ...
मंगेश तायडे
नांदगाव पेठ : अमरावती तालुक्यामध्ये चार ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत, तर एका ठिकाणी आरोग्य उपकेंद्र आहे. पाचही आरोग्य केंद्र मिळून तब्बल दीड लाख लोकसंख्या आहे आणि या दीड लाख लोकसंख्येमागे केवळ चार आणि त्याही भंगार रुग्णवाहिका सेवेत आहेत. तालुक्यातील वलगाव, माहुली जहागीर, शिराळा, अंजनगाव बारी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत.
महामार्गावर सर्वांत मोठे गाव असलेल्या नांदगाव पेठ येथे आरोग्य उपकेंद्र असून, महामार्गावरून १०८ रुग्णवाहिका गायब झाल्याने सध्या सर्व भार आयआरबीच्या रुग्णवाहिकेवर पडला आहे. विशेष म्हणजे, नांदगावपेठला ट्रामा केअर सेंटरची मागणी गेल्या २० वर्षांपासून लोकप्रतिनिधी करीत आहेत. परंतु, ट्रामा केअर युनिटचे स्वप्न भंगल्याने रुग्णांना जिवास मुकावे लागत आहे.
नांदगावपेठ हे लोकवस्तीच्या दृष्टीने सर्वांत मोठे गाव आहे. मात्र, या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र (अलोपॅथी दवाखाना) असून, सकाळी साडेआठ ते दुपारी १२ व दुपारी साडेचार ते साडेपाच असे केवळ साडेचार तास हे उपकेंद्र उघडे असते. त्यामुळे आजूबाजूच्या गावांतील रुग्णांना कधीच या शासकीय रुग्णालयाचा फायदा होत नाही. याउलट ग्रामीण भागातील रुग्ण हे खासगी दवाखान्यांकडे वळत आहेत. महामार्गावर हे गाव असल्याने दररोज अनेक अपघात होतात. त्यामुळे अत्यावश्यक असलेली १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका अपघातग्रस्तांच्या कधीच उपयोगी पडलेली नाही. महामार्गावर सध्या आयआरबीचीच रुग्णवाहिका सेवा देण्यात यशस्वी ठरली असून, एक महिन्यापासून तालुक्यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिलेली एक अत्याधुनिक रुग्णवाहिका सध्या सेवेत आहे.
शिराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत नसल्याने आहे त्याच ठिकाणी रुग्णसेवा सुरू आहे. प्रसूतीसाठीदेखील महिलांना याठिकाणी व्यवस्था होत नसल्याने त्यांना जिल्हा स्त्री रुग्णालयाचा किंवा खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. नांदगाव पेठ, शिराळा, वलगाव या ठिकाणी प्रत्येकी ४० हजार लोकसंख्या आहे. अंजनगाव बारी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संलग्न ३० हजार लोकसंख्या आहे. तब्बल दीड लाख लोकसंख्येचा भार चार वैद्यकीय अधिकाऱ्यांवर असून, आपत्कालीन परिस्थिती किंवा अपघातग्रस्तांना अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयातच रेफर करावे लागते, हे विशेष!
बॉक्स
अनेक ठिकाणी पदे रिक्त
एकंदर चार आरोग्य केंद्रे व एक उपकेंद्र या ठिकाणी लोकसंख्येच्या आधारावर कर्मचारीसंख्या अतिरिक्त असणे आवश्यक आहे. मात्र, अद्यापही अनेक ठिकाणी पदे रिक्त असल्याची माहिती आहे. यामध्ये प्रामुख्याने अंजनगाव बारी येथे हेल्थ असिस्टंट, माहुली जहागीर येथे आरोग्य सेविका ही पदे अजूनही रिक्त असल्याने इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढला आहे.
बॉक्स
तालुक्यात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. ज्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचा अभाव असेल, तो अभाव त्वरित दूर करण्यात येतो. ज्या ठिकाणी कर्मचारी पदे रिक्त आहेत, त्या ठिकाणचा पदे भरण्यासंबंधीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे.
डॉ. विनोद करंजीकर, तालुका आरोग्य अधिकारी, अमरावती
बॉक्स
आहे त्या परिस्थितीत सेवा देणे हा आरोग्य यंत्रणेचा मंत्र आहे. रुग्णसेवा देणे, रुग्णांची घरोघरी जाऊन माहिती घेणे, कोरोनाकाळात कर्मचाऱ्यांचा अभाव असला तरी प्रत्येक कर्मचाऱ्याने जबाबदारी घेत कोरोनाला हरविले आहे. सध्या आमच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा बळकट असून, कोणताही अभाव आमच्या आरोग्य केंद्रात नाही. तशी काळजीसुद्धा आमच्यावतीने आम्ही घेत आहोत.
- डॉ. रवींद्र शिरसाठ, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, माहुली जहागीर