लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : शेतकऱ्यांनी उगवण क्षमतेची खात्रीशीररीत्या तपासणी केलेले घरचे बियाणे वापरावे. बियाणे महोत्सवाच्या माध्यमातून एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना खात्रीशीर व उत्कृष्ट उगवण क्षमता असलेले बियाणे उपलब्ध होणार असून, शासन खंबीररीत्या शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री बच्चू कडू यांनी केले.चांदूर बाजार येथील प्रहार कार्यालयाच्या प्रांगणात बियाणे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ना. कडूंसह विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, चांदूर बाजारच्या तालुका कृषी अधिकारी फाल्गुनी ननीर, अचलपूरच्या तालुका कृषी अधिकारी स्नेहल ढेंबरे आदी उपस्थित होते. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बियाणे घरीच तयार करावे. याबाबत शास्त्रीय पद्धतीने बियाणे तयार करण्याच्या प्रक्रियेचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असल्याचे ना. कडू म्हणाले. बियाणे महोत्सवाच्या माध्यमातून ही चळवळ राबवावी. बीज उत्पादक शेतकऱ्यांना सर्व सुविधा पुरविणार असल्याची ग्वाही राज्यमंत्री कडू यांनी यावेळी दिली.
महोत्सवाचे वैशिष्ट्यबियाणे महोत्सवात वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ सहभागी झाले होते. ज्या शेतकऱ्यांकडे बियाणे नाही, त्यांच्यासाठी घरचे उत्पादित केलेले दर्जेदार बियाणे विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. शेतकरी बांधवांनी सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, कांदा, भुईमूग, भाजीपाला व इतर बियाणे वाजवी दरात उपलब्ध केली. बीजप्रक्रियेसाठी ड्रम व औषध उपलब्ध केले. विविध जैविक बीजप्रक्रिया साहित्य विक्रीसाठी येथे उपलब्ध होते. तळवेलचे प्रगतिशील शेतकरी भालचंद्र बोंडे, बेलोराचे येथील विजय कडू उपस्थित होते.