सीईओंकडून दखल; ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उपाय
अमरावती : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार आटोक्यात ठेवून विविध उपाययोजना राबविण्याची जबाबदारी ग्राम दक्षता समितीवर सोपविण्यात आली आहे. मात्र, सध्या जिल्ह्यातील काही अपवाद वगळता सर्व समित्या लॉक आहेत. याबाबत ‘लोकमत‘ने वृत्त प्रकाशित करताच जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी निष्क्रिय झालेल्या ग्राम दक्षता समित्या तातडीने ॲक्टिव्ह करण्याचे आदेश अधिनस्त यंत्रणेमार्फत दिले आहेत.
गाव पातळीवर कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना आणि आवश्यक कारवाई करण्यासाठी प्रशासनाने दक्षता समित्यांची स्थापना केली. मात्र, सध्या जिल्ह्यात काही अपवाद वगळता बहुसंख्य गावांत या समित्या नावापुरत्याच उरल्या होत्या. त्यामुळे स्थानिक पातळीवर कोरोना संदर्भातील उपाययोजना आवश्यक त्या प्रमाणात राबविल्या जात नव्हत्या. परिणामी याच निष्काळजीपणामुळे कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. भविष्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने वेळीच पुढाकार घेऊन दक्षता समित्या ॲक्टिव्ह करणे आवश्यक आहे. माक्सचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग तसेच होम आयसोलेशनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करून दंड करण्याचा अधिकार या समितीला देण्यात आला आहे. त्यानुसार गतवर्षी नियम मोडणाऱ्या अनेकांवर या समित्यांनी कारवाई केली होती. परिणामी लोकांच्या मध्ये समितीची जरब बसली होती. गतवर्षी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी या समित्यांनी आवश्यक त्या उपाययोजना करून चांगली कामगिरी केली होती. दरम्यान तीन चार महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. त्यामुळे समित्यांना मरगळ आली. त्यातच मध्यंतरी जिल्ह्यात अनेक गावांत निवडणुकीचे वातावरण होते. त्यामुळे अनेक ठिकाणी सत्ता बदल झाल्याने गाव कारभारी बदलले. अशातच गेल्या काही दिवसांत कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. दररोज वेगाने बाधितांची संख्या वाढते आहे. त्यामुळे शासनाने नवीन नियमावली लागू केली. मात्र दुसरीकडे दक्षता समिती निष्क्रिय असल्याचे चित्र आहे.या सर्व बाबीची दखल घेत मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी ग्राम दक्षता समिती ॲक्टिव्ह करण्याचे निर्देश दिले आहे. प्रत्येक गावातील ग्राम दक्षता समित्यांनी प्रशासन व शासनाकडून दिलेल्या सूचनेप्रमाणे आपले काम सुरू करावेत, अशा सूचनाही सीईओंनी दिल्या आहेत.
कोट
ग्राम दक्षता समितीचे कामकाज मधल्या कालावधीत काही गावांत थांबले होते. परंतु ग्रामीण भागातील कोरोना बाधिताची वाढती संख्या लक्षात घेता ग्राम दक्षता समित्यांनी जबाबदारीनुसार सक्रिय होऊन कर्तव्य बजावण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- अविश्यांत पंडा,
मुख्यकार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद