अमरावती - खासदार नवनीत राणा यांच्याविरुद्ध स्थानिक राजापेठ पोलिसांनी शनिवारी रात्री गुन्ह्याची नोंद केली. याबाबत येथील एका व्यक्तीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. भादंविचे कलम ५०० (बदनामी) व ५०६ (धाकदपटशा) नुसार खा. राणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार मनीष ठाकरे यांनी त्याला दुजोरा दिला. मात्र, हे अदखलपात्र गुन्हे दाखल करण्याऐवजी गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी केली आहे.
नवनीत राणा यांनी 'माझ्या मुलावर लव्ह जिहादचे आरोप करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे, त्यामुळे पोलिसांनी दाखल केलेले अदखलपात्र गुन्हे वाढवून गंभीर स्वरूपाचे गुन्हे पोलिसांनी गुन्हे दाखल करावे अशी मागणी त्या तरुणांच्या वडिलांनी केली आहे. तर, पीडित तरुणही पोलीस ठाण्यात पोहोचला असून त्यानेही माझ्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे.
याप्रकरणी विशिष्ट धर्मीय मुलाच्या वडिलांनी शनिवारी खा. नवनीत राणा यांच्याविरोधात तक्रार नोंदविली. खा.राणा यांच्या निवेदनामुळे माझ्या मुलाची तथा कुटुंबाची नाहक बदनामी झाली, तथा त्याला पाहून घेण्याची धमकी देखील देण्यात आली. त्यामुळे तो घराबाहेर पडण्याची हिंमत गमावून बसल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्या मुलीचा आपल्या मुलाशी दुरान्वये संबंध नसताना खा. राणा यांनी त्याला कडकपणे विचारा, त्याच्याशी नरमाईने वागू नका, अशी सूचना राणा यांनी पोलिसांना केल्याने आपला मुलगा प्रचंड दबावात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच, माझ्या मुलासह कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याचेही या कुटुंबीयाने म्हटले आहे.
काय आहे प्रकरण
अमरावतीमधील मुलीच्या अपहरणासंदर्भात, येथील एका मुलीचे विशिष्ट धर्मीय मुलाने अपहरण केले असून, त्याला कडकपणे विचारा, त्यातून सर्व उलगडेल, ते अपहरण नसून लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप खा. राणा यांनी ७ सप्टेंबर रोजी केला होता. त्यावरून खा. राणा यांनी राजापेठ पोलीस ठाणे गाठून ठाणेदार ठाकरे यांच्याशी मोठा वाद देखील घातला होता. तर दुसरीकडे ती मुलगी त्याच दिवशी सातारा येथे सुखरूप मिळाली होती. त्यापूर्वी, राजापेठ पोलिसांनी त्या मुलीच्या अपहरण प्रकरणी एका विशिष्ट धर्मीय मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच मुलाने त्या मुलीला लव्ह जिहादसाठी पळवून लावल्याचा आरोप लावण्यात आला.
रागाच्या घरात बाहेर पडली तरुणी
खासदार राणा यांनी देखील त्या मुलाची अधिक चौकशी करण्याची आग्रही मागणी पोलिसांकडे केली होती. प्रत्यक्षात मात्र आपले कुणीही अपहरण केले नाही. आपण स्वत:हून रागाच्या भरात एकटेच घराबाहेर पडलो, अशी स्पष्टोक्ती तिने दिली. तथा आपली बदनामी थांबवावी, असे आवाहन खासदार राणा यांना केले होते.