स्वत:साठी आणलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हदयरुग्णाने दिले भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:14 AM2021-05-12T04:14:29+5:302021-05-12T04:14:29+5:30
सामाजिक दातृत्वाचा संदेश, कोरोनाकाळात वंदे मातरम् फाऊंडेशनचा जात-धर्मविरहित उपक्रम अमरावती : हृदयरुग्णांना कोरोनाचा धोका सर्वाधिक गणला गेला आहे. त्यामुळे ...
सामाजिक दातृत्वाचा संदेश, कोरोनाकाळात वंदे मातरम् फाऊंडेशनचा जात-धर्मविरहित उपक्रम
अमरावती : हृदयरुग्णांना कोरोनाचा धोका सर्वाधिक गणला गेला आहे. त्यामुळे स्वत:च्या सुरक्षिततेसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणून ठेवले. मात्र, तूर्तास आवश्यकता नसल्याचे पाहून तब्बल ६५ हजारांची ही यंत्रणा दुसऱ्यांचा जीव वाचविण्यासाठी सामाजिक संस्थेला भेट दिले. अशोकराव गायगोले असे या दानदात्याचे नाव आहे. कोरोनाकाळातील ही सर्वोत्तम भेट असल्याची प्रतिक्रिया वंदे मातरम् फाऊंडेशनकडून देण्यात आली.
कोविड रुग्णांना बेड नाही. औषधी वेळेवर मिळत नाही. ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावत असल्याची ओरड आता प्रकर्षाने होऊ लागली आहे. त्यामुळे या आजाराची भीती स्वाभाविकच आहे. त्यामुळे या आजाराचा धोका टाळण्यासाठी औषधी व्यावसायिक अशोकराव गायगोले यांनी घरी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मागवले होते. ते पुरोगामी विचारसरणीचे खंदे कार्यकर्ते. त्यामुळे अशोकराव यांच्यातील सामाजिक कार्यकर्ता जागा झाला आणि तूर्तास आपल्या कामात नसलेले ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर इतर गरजू रुग्णांच्या कामी यावे, यासाठी त्यांनी ११ मे या वाढदिवशी वंदे मातरम् फाऊंडेशनकडे ही मशीन सुपूर्द केली. त्यांच्या अर्धागिनी दुर्गावती गायगोले यांनी त्यांच्या या निर्णयाला साथ दिली.
वंदे मातरम् फाऊंडेशन ही संस्था गत नऊ वर्षांपासून मेळघाटात सामाजिक कार्यात अग्रणी आहे. परंतु, वर्षापासून कोरोनाने कहर केला आणि फाऊंडेशनने अमरावतीकडे रोख केला. कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळवून देण्याच्या कार्यात संघटनेने झोकून दिले आहे. ज्या कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध नाही, त्या रूग्णांच्या घरी जाऊन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन लावून तात्पुरता दिलासा व ऑक्सिजन बेड उपलब्ध झाल्यास ती मशीन पुन्हा दुसऱ्या रुग्णास लावून देण्यासाठी ही संघटना जाती, धर्माच्या भिंती ओलांडून धडपडत आहे. या सामाजिक कार्यात वंदे मातरम् फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र दापूरकर, उपाध्यक्ष अमित जामोदे, सचिव रमेश धरमकर, कोषाध्यक्ष राहुल भोंडे, संजय शेकळे, हेमंत गावंडे, तुषार वरणगावकर हे कार्यरत आहेत. वंदे मातरम फाऊंडेशनने पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर गोळा करण्याचा संकल्प सोडला आहे. त्यापैकी एक मशीन या सर्वांनी स्वत: खरेदी केली. आता अशोकराव गायगोेले यांच्याकडून त्यांना दुसरी मशीन मिळाली आहे. कोरोनाला हरवून माणुसकीचा वेलु गगनावरी जावा, ही सदिच्छा यानिमित्ताने गायगोले यांनी व्यक्त केली आहे.