विदर्भात चोहीकडे बहुगुणी पळसाने केली लाल-शेंदरी उधळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:29 PM2018-03-01T12:29:24+5:302018-03-01T12:29:32+5:30
वसंताच्या आगमनापूर्वी निष्प्रभ-निस्तेज झालेल्या धरतीवर लाल रंगाची उधळण होण्यास सुरुवात झाली आहे.
सूरज दाहाट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वसंताच्या आगमनापूर्वी निष्प्रभ-निस्तेज झालेल्या धरतीवर लाल रंगाची उधळण होण्यास सुरुवात झाली आहे. जंगलात अन् रस्त्याच्या किणारी असणारा पळस बहरला असून जणू तो लाल रंगाची उधळणच करीत असल्याचा भास होत आहे. पळस सध्या चोहीकडे बहरला आहे. लाल, केशरी आणि क्वचित पांढऱ्या रंगाच्या फुलांनी बहरलेली पळसाची झाडे सध्या सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत.
पळसाचे पूर्वापार महत्त्व
२०-२५ फूट उंच असणाऱ्या पळसाला संस्कृतमध्ये पलाश म्हणतात. कुठेही गेले तरी पळसाला पाने तीनच, अशी म्हण प्रचलित आहे. पानझडीत सर्व पाने गळून गेल्यावर पळसाला फुलांचे घुमारे फुटतात. पळसाची पानेही फार उपयोगी आहेत. पूर्वी या पानांपासूनच मोठ्या पंगतीला जेवण देण्यासाठी द्रोण आणि पत्रावळ्या बनविल्या जात. आता काळ बदलला तरी त्याचे महत्त्व कमी झालेले नाही.
पळसाच्या फुलापासून नैसर्गिक रंग
पूर्वी धूलिवंदनाला एकमेकांच्या अंगावर उधळण्यासाठी उपयोगात येणारा नैसर्गिक रंग बनविण्याकरिता पळस फुलांचा वापर केला जात असे. तर आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणूनही याचा वापर होत असे. पळसाची फुले पाण्यात टाकून स्नान केले तर त्वचारोग नाहीसा होतो, असेही आयुर्वेदात म्हटले आहे. पळसाच्या बियांचाही औषधीसाठी वापर केला जातो.
डोळ्यांना सुखावणारा
बहरात आलेला पळस तर अक्षरश: ज्वालेसारखा दिसू लागला आहे, तर काही पळस युद्धात जखमी होऊन रक्तबंबाळ झालेल्या सैनिकासारखे दिसत आहेत. फुललेल्या पळसाच्या झाडाकडे पाहणाऱ्यांच्या डोळ्यांना भुरळ घालणारा पळस सध्या लाल गडद झाला असून डोळ्यांना सुखावणारा ठरू लागला आहे.