पांढरी खानमपूर ग्रामस्थांचा विभागीय आयुक्तालयासमोर ठिय्या
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: March 8, 2024 06:06 PM2024-03-08T18:06:59+5:302024-03-08T18:07:55+5:30
प्रशासनाच्या सोमवारच्या निर्णयानंतर ठरेल आंदोलनाची पुढची दिशा
अमरावती : गावाच्या प्रवेशद्वाराला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी पांढरी खानमपूर येथील बौद्ध बांधवांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर गुरुवारपासून ठिय्या आंदोलन सुरु केलेले आहे. विभागीय आयुक्तांद्वारा सोमवारी निर्णय देण्यात येणार आहे. तोवर आम्ही येथेच ठिय्या देणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
विभागीय आयुक्तांचा निर्णय अन्यायकारक असल्यास येथूनच आम्ही मुंबईच्या दिशेनी लॉग मार्च काढू व मुख्यमंत्र्यांनाच न्याय मागू, असे पांढरी खानमपूर येथील ग्रामपंचायत सदस्या छाया अभ्यंकर यांनी सांगितले. २६ जानेवारी २०२० व २०२४ चा ग्रामसभेचा ठराव असतांना प्रवेशद्वारासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप माजी सरपंच नागोराव राक्षसकर यांनी केला. त्यामुळे तात्पूरत्या स्वरुपात आम्ही प्रवेशद्वार उभारल्याचे आंदोलकांनी सांगितले. दरम्यान जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सदर कामाला टेटस्को दिलेला आहे व तसे पत्र स्थानिक ग्रामपंचायतीला दिलेले आहे.