पार्थिवाला भडाग्नी दिला अन्‌ अहवाल पॉझिटिव्ह आला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:12 AM2021-05-16T04:12:58+5:302021-05-16T04:12:58+5:30

नरेंद्र जावरे चिखलदरा : स्मशानभूमीत पार्थिवाला भडाग्नी दिला अन्‌ मृताचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची घटना तालुक्यातील काटकुंभ येथे ...

Parthiwala was fired and the report came back positive! | पार्थिवाला भडाग्नी दिला अन्‌ अहवाल पॉझिटिव्ह आला!

पार्थिवाला भडाग्नी दिला अन्‌ अहवाल पॉझिटिव्ह आला!

Next

नरेंद्र जावरे

चिखलदरा : स्मशानभूमीत पार्थिवाला भडाग्नी दिला अन्‌ मृताचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची घटना तालुक्यातील काटकुंभ येथे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास उघड झाली. मृताची चिता धगधगत असताना अहवाल मिळाल्याने सर्वांची पंचाईत झाली. मात्र, आता कुणाकुणाला कोरोनाचा संसर्ग होणार, या भीतीने अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्यांची पाचावर धारण बसली.

काटकुंभ येथील एका ६५ वर्षीय आजारी इसमाला नजीकच्या चुरणी येथील कोविड रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तेथे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. अहवाल प्रतीक्षारत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना बुधवारी अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल नसल्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आप्तेष्टांनी मृतदेह काटकुंभ गावी आणला.

सायंकाळी ६.३० वाजता अंत्यसंस्काराची तयारी झाली. मृतदेह घरीच आल्यामुळे जवळचे काही नातेवाईक अंत्ययात्रेत सहभागी झाले. बँडबाजा वाजत अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहोचली. त्याचदरम्यान काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रात दैनंदिन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल आला. त्यात सदर रुग्णाचे नाव येताच गावात एकच खळबळ उडाली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्मशानभूमीत जाऊन ही माहिती दिली. मात्र तोपर्यंत मृतदेहाला भडाग्नी देण्यात आला होता. मात्र, मृत हा कोरोनाबाधित असल्याचे कळताच उपस्थितांच्या पायाखालची वाळू सरकली. परिवारातील सदस्यांसह उपस्थितांनी आरोग्य विभागावर खापर फोडले. परंतु अमरावतीहून सदर अहवाल येत असल्याचे सांगितल्यावर तणाव निवळला. आता अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्यांना कोरोना तपासणीला सामोरे जावे लागणार आहे.

२५७ ॲक्टिव्ह रुग्ण

काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत रजनीकुंड, पाचडोंगरी, कन्हेरी, डोमा, काटकुंभ, काजलडोह ही गावे कोरोना हॉटस्पॉट ठरली आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एकूण २५७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

कोट

काटकुंभ येथील सदर इसमाचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता जिल्हास्तरावर प्राप्त होताच लगेच स्मशानभूमीत जाऊन नागरिकांना तात्काळ सांगण्यात आले.

- आदित्य पाटील,

वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र

काटकुंभ

Web Title: Parthiwala was fired and the report came back positive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.