खिरगव्हाण ग्रामपंचायतीकडून मुलींसाठी मुदत ठेवीची योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 09:57 PM2018-02-26T21:57:06+5:302018-02-26T21:57:06+5:30
स्त्री-पुरुष समानतेसाठी आपला हातभार लागावा, या दृष्टिकोनातून तालुक्यातील खिरगव्हाण ग्रामपंचायतीच्यावतीने शनिवार, १७ फेब्रुवरीपासून अभिनव योजना सुरू करण्यात आली आहे.
रवींद्र वानखडे ।
आॅनलाईन लोकमत
वनोजा बाग : स्त्री-पुरुष समानतेसाठी आपला हातभार लागावा, या दृष्टिकोनातून तालुक्यातील खिरगव्हाण ग्रामपंचायतीच्यावतीने शनिवार, १७ फेब्रुवरीपासून अभिनव योजना सुरू करण्यात आली आहे. गावात मुलगी जन्माला आली, तर तिच्या नावाने ग्रामपंचायत दोन हजार रुपयांचे फिक्स डिपॉझिट करेल, शिवाय आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मुलींच्या नावानेसुद्धा दोन हजार रुपये जमा केले जातील.
सरपंच पुरुषोत्तम घोगरे यांच्या संकल्पनेतून ही अभिनव योजना सुरू करण्यात आली आहे. खिरगव्हाण (समशेरपूर) हे एक हजार लोकसंख्येचे छोटेसे गाव. ग्रामपंचायतच्यावतीने स्त्रीजन्म प्रोत्साहनाला चालना देणारी अभिनव योजना सुरू करण्यात आली असून, महाराष्ट्रातील हा प्रथमच उपक्रम असावा.
ग्रामपंचायत हद्दीत मुलगी जन्माला आल्यास तिच्या नावे दोन हजार रुपये फिक्स डिपॉझिट करण्यात येईल, शिवाय गावातील आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मुलीच्या नावानेसुद्धा दोन हजार रुपये भरले जातील. शनिवार, १७ फेब्रुवारीला सरपंच पुरुषोत्तम घोगरे यांनी ग्रामसेवक, इतर सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची घोषणा केली.
गाव हगणदारीमुक्त, शिक्षणाला प्राधान्य
वर्षभरापूर्वी थेट निवडून आलेले सरपंच पुरुषोत्तम घोगरे यांनी शिक्षणाला प्राधान्य देऊन कार्य सुरू केले. गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेची अवस्था सुधारली व स्वच्छ महाराष्ट्र अभियानात सहभागी होऊन संपूर्ण गावाचे स्वरूप पालटले. यानंतर हगणदरीमुक्तीकडे गावाचा मोर्चा वळला. गाव पूर्णपणे हगणदारीमुक्त होऊन गोदरीच्या ठिकाणी संत गाडगेबाबा स्मारक उद्यान तयार करण्यात आले आहे. आणि घाणीचा येथे लवलेशही राहिलेला नाही.
स्त्रीजन्म नितांत गरज आज स्त्री-पुरुष सामाजिक असमतोल बघता, भविष्यातील चित्र भयावह आहे. समानतेसाठी आपला कुठे तरी हातभार लागावा, या दृष्टिकोणातून या उपक्रमाचे पाऊल उचलले आहे.
- पुरुषोत्तम घोगरे,
सरपंच, खिरगव्हाण