न्यूमोनिया प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:14 AM2021-07-07T04:14:49+5:302021-07-07T04:14:49+5:30
अमरावती ; न्यूमोनिया प्रतिबंधासाठी महत्त्वपूर्ण असलेली पी.सी.व्ही. ही लस जिल्ह्यात लवकरच उपलब्ध होणार असून, सर्वदूर लसीकरण करण्यात येणार ...
अमरावती ; न्यूमोनिया प्रतिबंधासाठी महत्त्वपूर्ण असलेली पी.सी.व्ही. ही लस जिल्ह्यात लवकरच उपलब्ध होणार असून, सर्वदूर लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली.
न्यूमोनियामुळे पाच वर्षांखालींल बालकात मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. एकूण बालमृत्यूपैकी १५ टक्के बालमृत्यू न्यूमोनियामुळे होतात. या पार्श्वभूमीवर ही लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. ही लस सर्वत्र विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. नियमित लसीकरणामध्ये आजपावेतो जन्मतः हेपॅटायटिस बी, पोलिओ, पेन्टाव्हॅलंट, ओ.पी.व्ही व आय.पी.व्ही, एम.आर., जे.ई., डीपीटी, टी.डी. रोटा व्हायरस आदींबाबत लसीकरण शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे या माध्यमातून होते. याच लसीकरणात आता पीसीव्ही लसीची भर पडली आहे. शासकीय आरोग्य यंत्रणेद्वारे सहा आठवड्याच्या बालकास पहिला डोस, १४ आठवडे वयाच्या बालकास दुसरा डोस व नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर तिसरा डोस दिला जाणार आहे.