बाहेरच्या पानासाठी सेंटर मस्ट
चांदूर बाजार : तालुक्यातील २० मे २०२० रोजी मुदत संपलेल्या ४१ ग्रामपंचायतींची निवडणूक आता १५ जानेवारी रोजी होऊ घातली आहे. याबाबत १५ डिसेंबर रोजी तहसीलदार निवडणूक नोटीस प्रसिद्ध करणार असल्याची माहिती आहे.
ग्रामपंचायतींची निवडणूक २९ मार्च २०२० रोजी मतदानाने पूर्ण होणार होती. परंतु कोरोनामुळे २७ मार्च रोजी निवडणूक प्रक्रिया मध्येच स्थगित करण्यात आली. मात्र, आता कोरोनाचा जोर ओसरल्याने राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. आता नवीन अंतिम मतदार यादीनुसार ही निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींमधील राजकारण पुन्हा नव्याने रंगणार आहे.
निवडणुकीत समाविष्ट ४१ ग्रामपंचायतींच्या १४० प्रभागांतून ३८१ सदस्यांची निवड मतदान प्रक्रियेव्दारे होणार आहे. निवडून आलेले ४१ ग्रामपंचायतींचे हेच सदस्य आपल्या-आपल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड करतील. यावेळी सरपंच निवडणूक ही निवडून आलेल्या सदस्यांमधून होणार आहे. सरपंचाची थेट निवडणूक यावेळी होणार नाही.