दहावी निकालानंतर प्रवेशाला संथगती, स्कूल कनेक्टचा फारसा परिणाम नाही, ५०५ विद्यार्थ्यांची नोंदणी
अमरावती : नोकरी, रोजगाराचा मर्यादित संधी आणि व्यवसाय अभ्यासक्रमात अनेक पर्याय उपलब्ध असल्याने गत काही वर्षांपासून तंत्रनिकेतनच्या प्रवेशाचे ‘तंत्र’ बिघडले आहे. प्रवेशाअभावी दरवर्षी रिक्त जागा कायम आहेत. यावर्षीही प्रवेशाची मुदत संपण्यास दोन दिवस शिल्लक असताना आतापर्यंत ५०५ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.
अमरावती जिल्ह्यात सहा तंत्रनिकेतन असून,१७६३ प्रवेश क्षमता आहे. दोन शासकीय, एक अनुुदानित आणि तीन अनुदानित असे एकूण सहा तंत्रनिकेतन विद्यालये आहेत. तंत्रनिकेतनच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १७६३ जागा असल्या तरी आतापर्यंत ५०५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ३० जूनपासून प्रवेशास प्रारंभ झाला असून, २३ जुलैपर्यंत तंत्रनिकेतनच्या प्रवेशाची मुदत आहे. अवघे तीन दिवस प्रवेशासाठी शिल्लक असताना १,७३६ जागांसाठी ५०५ एवढ्याच विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. शासनाने तंत्रनिकेतनच्या प्रवेशास मुदतवाढ दिली नाही तर पुन्हा यंदाही प्रवेशाअभावी जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.
-----------------
जिल्ह्यातील पॉलिटेक्निक : ०६
एकूण प्रवेश क्षमता : १७६३
आतापर्यंत गेले अर्ज : ५०५
अर्ज भरण्याची अखेरची मुदत : २३ जुलै
------------------
विद्यार्थ्यांकडे बैठक क्रमांक नाही
- दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला आहे. मात्र, मूळ गुणपत्रिका अद्यापही विद्यार्थ्यांना मिळाली नाही. त्यामुळे प्रवेशाच्यावेळी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतरही बैठक क्रमांक मिळत नसल्याने प्रवेशात अडचणी आहेत.
- पॉलिटेक्निक पदवी घेतल्यानंतरही नोकरीची हमी नाही. त्यामुळे ज्या शिक्षणामुळे नोकरी, रोजगार मिळेल, त्याच अभ्यासक्रमांकङे विद्यार्थ्यांचा कल आहे.
------------------
दहावी निकालानंतर प्रवेशास गती संथ
- दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तंत्रनिकेतनच्या प्रवेशास गती मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
- तंत्रनिकेतनच्या प्रवेशास गती येण्यासाठी स्कूल कनेक्ट हा उपक्रम राबविला. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. प्रवेशास केवळ दोन दिवस शिल्लक असताना १२६८ जागा रिक्त आहेत.
- दहावीनंतर उत्तीर्ण विद्यार्थी हे रोजगार,नोकरीसाठी तंत्रनिकेतनपेक्षखा आयटीआयला प्राधान्य देतात. परिणामी पॉलिटेक्निकच्या प्रवेशावर परिणाम होत आहे.
-----------------
गेल्यावर्षी १० टक्के जागा रिक्त
गतवर्षी क्षमतेपेक्षा कमीच प्रवेश झाले हाेते. त्यामुळे तंत्रनिकेतनच्या १० टक्के जागा रिक्त होत्या. गेल्या काही वर्षापासून प्रवेशासाठी वानवा आहे. विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचूनही प्रवेश घेत नसल्याने अनेक ‘तंत्र’ शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.
----------------
तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ मिळेल, असे संकेत आहेत. ‘स्कूल कनेक्ट’ या उपक्रमातून २४ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता आले. पॉलिटेक्निक पदवीतून नोकरी, रोजगाराची संधी आहेत. पुढे अभियांत्रिकीत प्रवेश घेता येताे. आतापर्यत जिल्ह्यात ३० टक्के प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
- राजेंद्र मोगरे, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन
-----------------
आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नाही नोकरी मिळाली तर काही रोजगार उभारता येतो. मात्र, तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाची पदवी घेतल्यानंतर काहीच हमी नाही.
- विशाल बोरकर, विद्यार्थी
---------------------
तंत्रनिकेतन अभ्यासक्रम चांगला आहे. पण, या पदवीतून नोकरी, रोजगार मिळेल का? हा महत्वाचा प्रश्न आहे. निव्वळ पदवी घ्यायची आणि वेळ, श्रम वाया घालवावा लागतो. त्यामुळे रोजगाराभिमुख अभ्यासक्रमास पसंती आहे.
- निशांत देशमुख, विद्यार्थी