एमसीक्यू पद्धतीने प्रात्यक्षिक परीक्षा, विधी विद्यार्थ्यांच्या मुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:14 AM2021-04-01T04:14:25+5:302021-04-01T04:14:25+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्न विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हिवाळी २०२० परीक्षांच्या अनुषंगाने विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी अगोदरच प्रचलित ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्न विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हिवाळी २०२० परीक्षांच्या अनुषंगाने विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी अगोदरच प्रचलित पद्धतीने प्रात्यक्षिक पूर्ण केले आणि जर्नलही दाखल केले आहे. मात्र, आता विद्यापीठाने एमसीक्यू पद्धतीने नव्याने प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याबाबतचे परिपत्रक मंगळवारी जारी केल्यामुळे विद्यार्थी संभ्रमित झाले आहे. विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रात्यक्षिक परीक्षा देण्याचा प्रसंग ओढावणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष उफाळून आला आहे.
कोरोना संसर्गामुळे महाविद्यालये बंद, ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. अशातच विधी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. गत काही महिन्यांपूर्वी विधी अभ्यासक्रमांच्या नियमित आणि बॅकलॉग विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक परीक्षा दिल्यात. वेगवेगळ्या विषयांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. विधी विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमानुसार प्रात्यक्षिकाचे सादरीकरण, प्रात्यक्षिक मुर्टकोर्ट सादरीकरण केले आहे. वकिलांच्या दालनात भेटीसुद्धा दिल्या आहे. न्यायालयात भेटी दिल्यात आहे. हा सर्व प्रात्यक्षिक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी मार्च २०२० पूर्वी पूर्ण केलेला आहे. त्याचे जर्नलही महाविद्यालयात सादर केलेले आहेत. सदर अभ्यासक्रमात मौखिक परीक्षा घेणे बाकी आहे. अशा पद्धतीने विद्यापीठाने नव्याने एमसीक्यू पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत सुचविले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा नसून, तो अन्यायकारक आहे.
---------------
विद्यापीठाने विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षांसाठी घेतलेला निर्णय चुकीचा आहे. अगोदर प्रात्यक्षिक परीक्षा दिली. दोन ते अडीच महिने वाया गेले. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा जुन्याच पद्धतीने घेण्यात याव्यात.
- सिद्धार्थ हिरोळे, विद्यार्थी
-------------------
गाव, खेड्यातील विद्यार्थ्यांना एमसीक्यू पद्धतीच्या ऑनलाईन प्रात्यक्षिक परीक्षा शक्य नाही. अगोदर झालेल्या प्रचलित पद्धतीच्या प्रात्यक्षिक परीक्षा ग्राह्य धरण्यात याव्यात. नव्या प्रात्यक्षिक परीक्षा विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी नुकसानदायक ठरणाऱ्या आहे.
- प्रीती पवार, विद्यार्थिनी, तृतीय सेमिस्टर
------------------
विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे व्हायवा होणे शिल्लक आहे. हीच बाब एमसीक्यू पद्धतीने घेण्याचे कळविले आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड असेल. यात कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान नाही.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ