तीन लाख घनमीटर कचऱ्यावर प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 06:00 AM2019-12-08T06:00:00+5:302019-12-08T06:00:34+5:30
बायोमायनिंग ही एक जुना व नवा कचरा डीग्रेड करण्यासाठी वापरल्या जाणारी पद्धत आहे. सुकळी येथे २५-३० वर्षांपासून साचलेले कचºयाचे डोंगर, त्याला लागणाऱ्या आगी व त्यापासून होणारे प्रदूषण हे महापालिका प्रशासनासाठी अवघड जागेचे दुखणे होते. आयुक्त संजय निपाणे यांनी पाठपुरावा करून हा प्रकल्प मंजूर केला व आता तो मार्गी लागला आहे.
गजानन मोहोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तीन दशकांपासून सुकळी कंपोस्ट डेपोत तयार झालेल्या किमान तीन लाख घनमीटर कचºयावर प्रक्रिया करून जागा मोकळी करण्यासाठी बायोमायनिंगची प्रक्रिया अत्यावश्यक होती. या प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी १५ बाय १०० मीटर लांबीचे पाच ढीग तयार करण्यात आले आहेत. यावर शास्त्रीय पद्धतीने विघटनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. महापालिकेसाठी डोकेदुखी ठरलेला हा प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे.
बायोमायनिंग ही एक जुना व नवा कचरा डीग्रेड करण्यासाठी वापरल्या जाणारी पद्धत आहे. सुकळी येथे २५-३० वर्षांपासून साचलेले कचऱ्याचे डोंगर, त्याला लागणाऱ्या आगी व त्यापासून होणारे प्रदूषण हे महापालिका प्रशासनासाठी अवघड जागेचे दुखणे होते. आयुक्त संजय निपाणे यांनी पाठपुरावा करून हा प्रकल्प मंजूर केला व आता तो मार्गी लागला आहे. शहरात दररोज २५० एमटीपी कचरा निर्माण होतो. तो सुकळी कंपोस्ट डेपोत टाकला जातो. तेथे उपलब्ध असलेल्या ९.३५ हेक्टर जागेची क्षमता संपली असली तरी कचऱ्याची भर त्यावर पडत आहे. २४ आॅगस्ट २०१७ रोजी डीपीआर करण्यासाठी महापालिकेत पहिली बैठक झाली व त्यानंतर बैठकांचा रतीबच झाला. अखेर ४०.७७ कोटीच्या प्रकल्प अहवालास मजीप्राची तांत्रिक मंजुरी मिळाली होती.
एक वर्षानंतर सुरुवात
अमरावती : नगरविकास विभागाने १३ नोव्हेंबर २०१८ ला प्रक्रिया न करता साठविलेल्या कचºयावर बायोमायनिंगची पद्धतीने प्रक्रिया करण्यास मान्यता देण्यात आली व त्यानंतरचे सर्व सोपस्कार आटोपून आत एक वर्षानंतर का होईना, या प्रकल्पाच्या कामांना सुरुवात झालेली आहे. यामध्ये २०० एमटीपी सुकळी कंपोस्ट डेपो, १०० एमटीपी अकोली बायपास व ५० एमटीपी बडनेरा-कोंडेश्वर येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. यासाठी केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा म्हणून ११.८७ कोटी रुपये महापालिकेला प्राप्त झाले आहेत. यासाठी पहिली निविदा प्रक्रिया १७ डिसेंबर २०१८ ला सुरू झाली. त्यानंतर तीनवेळा ही प्रक्रिया झाली व सद्गुरू बागडेबाबा इंटरप्रायझेससोबत बायोमायनिंग कामाचा २० सप्टेंबर २०१९ ला करारनामा करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
असा आहे कामांना वाव
या प्रकल्पातंर्गत कचरा विलिगीकरणात डम्पिंग यार्ड, एमआरएफ शेड, विंड्रो प्लॉटफार्म, बिग गॅस प्लँट, बायॅगॅस प्लँट तसेच कचरा टाकण्याकरिता व्यवस्था व जागा, सुरक्षा रक्षकांची रूम बांधणे, पाणी निचऱ्याची व्यवस्था करणे, अंतर्गत रस्ते तयार करणे, जुन्या कचऱ्यावर बायोमायनिंग करणे, जागेवर हिरवळ तयार करणे, व्यवस्थापन इमारत बांधणे, आग नियंत्रण व्यवस्था, पाणी व्यवस्था, विद्युत व्यवस्था व जीएसटीचा भरणा, यंत्रसामग्री तसेच वार्षिक देखरेख व दुरुस्ती आदी कामे केली जाणार आहेत.
अशी आहे बायोमायनिंगची प्रक्रिया
कचऱ्याचे चर तयार करून त्यावर बायोकल्चर पसरावा लागतो व त्यावर पाण्याचा मारा करून उलटापालट करावी लागते. यानंतर कचऱ्याचे विघटन होऊन आकारमान कमी होतो. मोठ्या स्क्रीनवर कचऱ्याची प्लास्टिक, रबर, ८० व २०० मिमीपेक्षा मोठे दगड, माती व काडीकचरा आदी विभागाची होते. यापैकी काही अवशेष सिमेंट फॅक्टरी व रबर फॅक्टरीसाठी वापरले जातात. खोलगट भागात टाकून खत तयार केले जाते. ते लगतच्या शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे प्रकल्पाचे सहायक अभियंता लक्ष्मीकांत पावडे यांनी सांगितले.
सततच्या पाठपुराव्याअंती हा महत्त्वाचा प्रकल्प मार्गी लागला. सर्वाच्या सहकार्याने लवकरच संपूर्ण प्रकल्प पूर्णत्वाला जाईल, असा विश्वास आहे.
- संजय निपाणे
आयुक्त, महापालिका