चार वर्षांपासून अंजनसिंगीत प्रतिबंधित बियाण्यांचा गोरखधंदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:18 AM2021-06-16T04:18:00+5:302021-06-16T04:18:00+5:30
आरोपीच्या शोधात दोन पथके, मोबाईलचा सीडीआर मिळविणार धामणगाव रेल्वे : सुमारे १४ लाख ५० हजार ३९७ रुपयांच्या ...
आरोपीच्या शोधात दोन पथके, मोबाईलचा सीडीआर मिळविणार
धामणगाव रेल्वे : सुमारे १४ लाख ५० हजार ३९७ रुपयांच्या प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे जप्तीप्रकरणी मुख्य आरोपी अद्यापही पसार आहे. अन्य एका अटकेतील आरोपीला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. आरोपीच्या शोधार्थ तीन पोलीस पथके पाठविण्यात आली आहेत. यादरम्यान चार वर्षांपासून अंजनसिंगी येथे प्रतिबंधित एचटीबीटी प्रतिबंधित बियाण्यांचा गोरखधंदा सुरू असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.
कुऱ्हा पोलिसांच्या हद्दीत अंजनसिंगी परिसरात काही व्यक्ती अनधिकृत कपाशी बियाण्यांची विक्री करीत असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर रविवारी रात्री सापळा रचून कृषी विभागाने तिवसा तालुक्यातील दुर्गवाडा येथे पोहोचून सतीश गणेश ठाकरे याच्याकडे बियाण्याची मागणी केली. त्याने बियाणे आणताच हे बियाणे कुठून आणले, याची विचारणा करताच अंजनसिंगी येथील प्रमोद वामन देवघरे या आरोपीचे नाव समोर आले. या पथकाने थेट प्रमोद देवघरे याच्याकडे धाड टाकून ३९ गोण्यांमधील १८९१ बियाणे पाकीट जप्त केले. यावेळी भरारी पथकाने सतीश गणेश ठाकरे यांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केले. सतीश ठाकरे याला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बॉक्स
मोबाईल ट्रेसिंगवर
मुख्य आरोपी प्रमोद वामन देवघरे हा पसार झाला आहे. कुऱ्हा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर वर्गे यांनी त्याच्या शोधासाठी दोन स्वतंत्र पोलीस पथके वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात रवाना केली. प्रमोद देवघरे याचा मोबाईल क्रमांक ट्रेसिंगवर टाकला आहे.
बॉक्स
पंचक्रोशीत विक्री
अंजनसिंगी, दुर्गवाडा, पिंपळखुटा, गव्हा फरकाडे, गव्हा निपाणी भागात चार वर्षांपासून प्रतिबंधक बीटी बियाण्यांची विक्री होत आहे. दरवर्षी या भागातील तक्रारींसाठी कृषी विभागाकडे रीघ लागत असते. तत्कालीन तालुका कृषी अधिकारी तथा या पथकातील जिल्हा कृषी अधिकारी अजय तळेगावकर यांना धामणगाव तालुक्यातील एचटीबीटी बियाणे उगवत नसल्याच्या तक्रारी आढळल्या होत्या.