शिक्षकांचे बेमुदत उपोषण: शिक्षण उपसंचालकांना जेवणअमरावती : गत १३ दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. मात्र शासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शिक्षकांनी सोमवारी राज्य शासनाची प्रतिकात्मक तेरवी साजरी करून संतप्त भावना व्यक्त केल्यात. येथील शिक्षण उपसंचालकांसह अन्य कर्मचाऱ्यांना तेरवीचे जेवण देण्यात आले.काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर, राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे विभागीय अध्यक्ष एस. के. वाहुरवाघ, राज्य संघटक पुंडलिक रहाटे, कार्याध्यक्ष सुरेश सिरसाट, सचिव दीपक देशमुख, सनघटक बाळकृष्ण गावंडे आदींच्या नेतृत्वात शासनाची प्रतिकात्मक तेरवी साजरी करण्यात आली.यावेळी शिक्षण उपसंचालक कुळकर्णी यांच्या दालनात उपोषणकर्त्या शिक्षकांनी जाऊन त्यांना जेवणाचे ताट देत शासनाची तेरवी करीत असल्याची नारेबाजी दिली. दरम्यान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या वेळकाढू धोरणाबद्दल घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनाला रयत संघटनेचे राहुल कडू, शिक्षक आघाडीचे झुडपे सर, उर्दू टिचर्स असोशिएशनचे गाजी जहरोश, आर. जी. पठाण, सुनील देशमुख, गोपाल चव्हाण, विष्णू सालपे, मनोज कडू, अनिल पंजाबी, मोहन ढोके, नितीन टाले, संदीप भटकर, जीवन सोनखासकर, दिलीप उगले, मोहन पांडे आदी शिक्षक उपस्थित होते.शासनरुपी प्रतिकात्मक हनुमानद्वारे आंदोलनएकिकडे तेरवी साजरी करून शासनाचा निषेध नोंदवीत असताना शिक्षकांनी शासनरुपी प्रतिकात्मक हनुमानद्वारे आंदोलन करून लक्ष वेधले. शासनाने कामकाज हनुमानाच्या शेपटी प्रमाणे लांबत जाणारे असल्याचे या अभिनव आंदोलनद्वारे मांडण्यात आले. शैक्षणिक कार्यालये ही कुचकामी असल्याचे गगनभेटी नारेबाजी देण्यात आली.मंगळवारपासून आंदोलनाची तीव्रता - संजय खोडकेगत १३ दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांचे बेमुदत आंदोनल सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे हे गांभीर्याने घेत नाही, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांनी केला. मंगळवारी १४ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थासमोर शिक्षकांचे धरणे आंदोलन होणार आहे. तसेच विभागस्तरावर आंदोलनाची तीव्रता वाढविली जाईल, ही बाब संजय खोडके यांनी स्पष्ट केली.शिक्षकांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही- शेखर भोयरविनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्यांसाठी शासनाने बळी घेतलेल्या गजानन खरात यांचे बलिदान कदापीही वाया जाऊ देणार नाही, अशी प्रतिज्ञा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर यांनी घेतली आहे. शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आता त्यांचे कुटुंब रस्त्यावर उतरतील, असा इशारा भोयर यांनी दिला.
प्रतिकात्मक तेरवी करून शासनाचा निषेध
By admin | Published: June 14, 2016 12:02 AM